खासदार गांधी यांची माहिती , जिल्ह्य़ात सात उड्डाणपुलांना मान्यता
नगर ते पुणे रेल्वे अंतर कमी करण्यासाठी, ‘कॉडलाईन’ टाकण्यासाठी १९ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. या कामाची लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाईल. त्याचबरोबर कोपरगाव ते दौंड रेल्वेमार्गावर नगर जिल्ह्य़ात सात ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल उभारण्यास परवानगी मिळाली आहे. नगरच्या रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम दिवाळीपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
खासदार दिलीप गांधी यांनी ही माहिती आज, शुक्रवारी पत्रकारांना दिली. नगर रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणाच्या कामाबाबत गांधी यांनी आज रेल्वे विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली तसेच स्थानकात सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. यावेळी वरिष्ठ विभागीय अभियंता के. आर. देवनाले व शिवाजी कदम (सोलापुर), वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक राजेंद्र शर्मा, सहायक विभागीय अभियंता एस. सुरेशकुमार (नगर), सुरक्षा विभागाचे कमांडंट व्ही. कोटानायक आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर गांधी यांनी ही माहिती दिली.
कॉडलाईनमुळे दौंड टाळून नगरहून पुण्याला जाणे शक्य होणार आहे. त्यामुळे दौंडमधील ४० मिनिटांचे अंतर व वेळ वाचणार आहे. त्यासाठी सुमारे २० कोटी रुपये उपलब्ध करण्यात आले आहे.
मनमाड ते काष्टी या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून काष्टी ते दौंड मार्गाचे विद्युतीकरण येत्या पंधरा दिवसांत होईल, नंतर त्याची चाचणी होणार आहे. या कामाचे लोकार्पण रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती गांधी यांनी दिली.
सध्या नगरच्या स्थानकावर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे, त्यासाठी आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे, सध्या सरकता जीना, गोडावून शेड, हिरकणी कक्ष उभारला जात आहे. नगरच्या स्थानकाचा ‘मॉडेल स्थानक’ म्हणून समावेश करण्यात आला आहे. ही कामे दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. कोपरगाव ते दौंड मार्गावर जिल्ह्य़ात काणेगाव (कोपरगाव), राहुरी, वांबोरी, देहरे, विळद, काष्टी व श्रीगोंदे फॅक्टरी येथे ७ उड्डाणपूल उभारण्यास परवानगी मिळाली आहे, यासाठी रेल्वे ५० टक्के हिस्सा व केंद्र, राज्य सरकार उर्वरित निधी देणार आहे, असे गांधी यांनी सांगितले.
नगर-बीड-परळी व बेलापूर-नेवासे-शेवगाव-गेवराई हे मार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक सुवेंद्र गांधी, डॉ. सुधा कांकरिया, विश्वनाथ पोंदे, श्रीकांत साठे, शरद दळवी, बाळासाहेब पोटघन, नितीन शेलार आदी उपस्थित होते.