करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या परिस्थितीत लातूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या २० दिवसांमध्ये लातूरमधील खासगी रूग्णालयांत ५०० हून अधिक प्रसुती झाल्या आहेत. दरम्यान, या कालावधीत बहुतांश प्रसुती या पीपीई सुट्सशिवायच करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसंच ज्या रूग्णालयात करोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत अशा जिह्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये हे पीपीई किट्स देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) ठरवून दिलेल्या नियमांनुसार रुग्णालयातील कर्मचार्‍यांकडून प्रसुतीच्या वेळी तसंच खासकरुन सिझेरियनच्या वेळी ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’चा वापर बंधनकारक केला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

लातूर जिल्ह्यात जवळपास १८० खासगी रुग्णालये असून सध्या पीपीई किट उपलब्ध नसल्यामुळे ते पीपीई शिवायचं सामान्य आणि सिझेरियन प्रसुती करण्यात येत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. “लॉकडाउनच्या २० दिवसांच्या कालावधीतील करण्यात आलेल्या आमच्या सर्वेक्षणात या ठिकाणच्या खासगी रुग्णालयांमध्ये ५०० पेक्षा अधिक प्रसुती झाल्याचं आढळून आलं आहे. कोणत्याही प्रकारचे सेफ्टी गीअर परिधान न करता सामान्य तसंच सिझेरियन प्रसुती करण्यात आल्या आहेत,” अशी माहिती ओबीजीव्हायएन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण बरमाडे यांनी दिली.

“लातूर जिल्ह्यात साठा संपल्याने खासगी रुग्णालयांना पीपीई किट मिळणे शक्य झाले नाही. जिल्हा प्रशासनानं संपूर्ण साठा करोनाचे उपचार करण्यासाठी सुरू असलेल्या सरकारी रुग्णालयांसाठी घेतला असल्याचं दिसत आहे,” असं मतही डॉ. बरमाडे यांनी व्यक्त केलं. सिझेरियन प्रकारच्या प्रसुतीमध्ये जवळपास डॉक्टर्स, परिचारिका यांच्यासह पाच वैद्यकीय कर्मचारी उपस्थित असतात. तर सामान्य प्रसुतीसाठी तीन वैद्यकीय कर्मचारी उपस्थित राहतात. परंतु सध्या त्यांना पीपीई किटशिवायच प्रसुती करावी लागत आहे. तसंच आई आणि बाळाच्या जीवितासही धोका आहे अशी त्यांना भीती आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.