News Flash

पश्चिम वऱ्हाडात मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

दररोज सरासरी ११ करोनाबाधितांचा मृत्यू; १५ दिवसांत २० हजारांवर रुग्णांची भर

दररोज सरासरी ११ करोनाबाधितांचा मृत्यू; १५ दिवसांत २० हजारांवर रुग्णांची भर

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : पश्चिम वऱ्हाडात करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक ठरत आहे. गेल्या १५ दिवसांपासून दररोज सरासरी ११ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्हय़ात झाले. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्हय़ांमध्ये १५ दिवसांत तब्बल २० हजार ११३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. अत्यंत वेगाने वाढत चाललेल्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा देखील अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांचे मृत्यू वाढले आहेत.

फेब्रुवारी महिन्यांपासून करोना संसर्ग झपाटय़ाने वाढत आहे. प्रशासनाकडून करोना नियंत्रणासाठी टाळेबंदी, संचारबंदी आदींसह विविध उपाययोजना करूनही परिस्थिती नियंत्रणात आलेले नाही. एप्रिल महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये तर करोनाचा स्फोट झाला. दररोज मोठय़ा संख्येने बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला. परिणामी, करोनाबाधितांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील मोठी वाढ नोंदविण्यात आली. अकोला जिल्हय़ात १ ते १५ एप्रिल या कालावधीत ४ हजार ४७१ रुग्ण आढळून आले. तब्बल ८६ करोनाबाधित रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. या कालावधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढल्याने ६ हजार १०१ रुग्णांनी करोनावर मात केली. त्यामुळे १ हजार ७१६ सक्रिय रुग्ण संख्या कमी झाली. बुलढाणा जिल्हय़ामध्ये बाधितांची मोठय़ा प्रमाणात भर पडत आहे. गत १५ दिवसांत ११ हजार ११२ रुग्ण आढळून आले आहेत. या कालावधीत तब्बल ५८ रुग्णांचा जीव गेला, तर सक्रिय रुग्णसंख्या १३१ने वाढली. जिल्हय़ात रुग्ण ठिक होण्याचे प्रमाणही चांगले आहे. १५ दिवसांत ११ हजार ००३ रुग्ण करोना संसर्गातून बरे झाले.

वाशीम जिल्हय़ात सुद्धा करोना संसर्गाचा १५ दिवसांमध्ये उद्रेक झाल्याचे दिसून येते. जिल्हय़ात ४ हजार ५३० रुग्णांची वाढ झाली. २९ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ४५९ सक्रिय रुग्ण वाढले. ४ हजार ०४२ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

एप्रिल महिना करोनावाढीसाठी पोषक ठरत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. १५ दिवसांमध्ये पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्हय़ांमध्ये १७३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानुसार दररोज सरासरी ११ पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहेत. रुग्ण वाढीसोबतच मृत्यूचे प्रमाण देखील झपाटय़ाने वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. करोना नियंत्रणासाठी राज्यात संचारबंदीसह विविध र्निबध असताना जीवनावश्यकच्या नावावर बाजारपेठांमधील गर्दी कायम आहे. गृहविलगीकरणातील रुग्ण व बाधितांच्या संपर्कातील लोकांचा मुक्तसंचार सुरूच आहे. त्यामुळे बाधितांची वाढती संख्या अद्यापही नियंत्रणात आलेली नाही.

विदर्भात करोनाचे १८७ मृत्यू; २४ तासांत १३०६६ रुग्णांची भर

नागपूर : विदर्भाच्या अकरा जिल्ह्य़ांत शुक्रवारी दिवसभरात १८७ रुग्णांचा मृत्यू झाला असून तर २४ तासांत तब्बल १४ हजार ३०३ नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. नागपूर शहर व जिल्ह्य़ात एकूण ७५ करोनाग्रस्तांचे मृत्यू झाले. तर येथे ६ हजार १०९ रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात १६ रुग्णांचा मृत्यू तर १ हजार ३९३ रुग्ण आढळले. अमरावतीत ३ मृत्यू तर ६८० नवीन रुग्ण, चंद्रपूरला ७ मृत्यू तर १ हजार १३५ रुग्ण, गडचिरोलीत ११ मृत्यू तर ४३४ रुग्ण, गोंदियात २९ मृत्यू तर ५७८ रुग्ण, यवतमाळला २६ मृत्यू तर १२३७ रुग्ण, वाशीमला ५ मृत्यू तर ५६९ रुग्ण, अकोल्यात ६ मृत्यू तर ४४८ रुग्ण, बुलढाण्यात ४ मृत्यू तर ११४० रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात ५ मृत्यू तर ५८० रुग्ण आढळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 2:05 am

Web Title: 20 thousand covid 19 cases found in akola washim and buldhana districts in last 15 days
Next Stories
1 प्राणवायूअभावी दीड तासात गोंदियात १५ जणांचा मृत्यू
2 राजाराम महाराजांचे भोजपत्रावरील साहित्य दुर्लक्षित
3 रेमडेसिविरचा तुटवडा कायम
Just Now!
X