अलिबाग तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. मागील ५ दिवसांपासून दररोज  शंभरहून अधिक रूग्णांची नोंद होत असताना बुधवारी दिवसभरात रूग्णासंख्या २०० पार गेली आहे. अलिबाग तालुक्यात बुधवारी करोनाच्या २०६ नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे . बुधावारी दिवसभरात आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये ग्रामीण भागात संख्या  मोठी आहे. यात पोयनाड आंबेपूर भागात सर्वाधिक रुग्ण असल्याचे समोर आले आह. अनलॉक झाल्यानंतर लोकांमधील करोनाची भीती जवळजवळ नाहीशी झाली होती. मात्र गणेशोत्सवानंतरची वाढती रुग्ण संख्या चिंताजनक बनली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .

दरम्यान अलिबाग तालुक्यात करोना चाचण्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. शासकिय तसेच खासगी यंत्रणांमार्फत करोना चाचण्या केल्या जात आहेत. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर देखील ही सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे  दिवसभरात दररोज ४०० हून अधिक जण चाचण्या करून घेत आहेत. त्यामुळे हा मोठा आकडा समोर आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. बुधवारी दिवसभरात ४२ जण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ हजार ५५ इतकी झाली आहे .तर आजवर ६९ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या ९०१ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनामुळे नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन घेण्यात यावे अशी मागणी होऊ लागली आहे. दुसरीकडे काही गावांमध्ये स्वयंघोषित लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे .

रायगड जिल्ह्यात बुधवारी ९६३ करोनाचे नवे रुग्ण आढळून आले, ४३६ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ५ हजार ८८४ अ‍ॅटिव्ह रुग्ण आहेत, ९२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत २७ हजार ५० जण करोनातून पूर्ण बरे झाले आहेत.