चंद्रपूर : करोना टाळेबंदीच्या चार महिन्यात २१ शेतकऱ्यांनी व ६ छोटय़ा व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जानेवारी ते जूनदरम्यान एकूण २८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून ८ शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना प्रत्येकी १ लाख याप्रमाणे केवळ ८ लाखाची मदत मिळाली आहे. १४ शेतकरी कुटूंब आत्महत्येच्या प्रतीक्षेत आहेत.

टाळेबंदीमुळे व्यापार, उद्योगधंदे उध्वस्त झाले आहेत. असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्याने बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढली आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे. बेरोजगार, छोटे व्यापारी व शेतकऱ्यांचे आत्महत्या सुरू झाल्या आहेत.

जिल्हय़ात २४ मार्च पासून सुरू झालेल्या टाळेबंदीनंतर २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. यामध्ये मार्च ३, एप्रिल महिन्यात ८, मे ४ व जून महिन्यात ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यातील फक्त आठ शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख प्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे. उर्वरित १४ शेतकऱ्यांना  मदत मिळालेली नाही. त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. तर दोन प्रकरणे फेरचौकशीत असून ४ शेतकऱ्यांच्या कुटूंबांना मदतीसाठी अपात्र ठरविले आहे. टाळेबंदीत मूल येथे एका पान दुकान चालकाने व्यवसाय बुडाला म्हणून आत्महत्या केली.  ऊर्जानगर येथे नाभिक समाजाच्या केशकर्तनालय चालकाने आत्महत्या केली. टाळेबंदीत त्याचा व्यवसाय बंद झाला होता. आर्थिक अडचण आणि दुकान बंद अशात त्याने आत्महत्या केली.

चिमूर येथे एका छोटय़ा किराणा व्यवसायिकाने तर चंद्रपुरात चहापत्तीची एजन्सी चालविणाऱ्या व्यापाऱ्याने आत्महत्या केली. बल्लारपुरात पान दुकान चालक व एका छोटय़ा गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करणाऱ्याने आत्महत्या केली. विशेष म्हणजे कौटूंबिक कलहातूनही आत्महत्या झाल्याच्या घटनांची नोंद घेण्यात आली. यात शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली, मात्र आत्महत्या करणाऱ्या छोटय़ा व्यवसायिकांना मदत मिळाली नाही. त्यांचे कुटूंब आजही उघडय़ावर आहे.