प्रतिनिधी
अकोला  शहरात झपाट्याने वाढलेल्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने गुरुवारी द्विशतक पार केले. आज एकाच दिवशी शहरात तब्बल २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २०७ वर पोहोचली. सध्या १२० करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अकोला शहरात करोनाचा प्रकोप चांगलाच वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात आणखी २१ नव्या रुग्णांची भर पडली. या अगोदर ८ मे रोजी एकाच दिवशी ४२ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर एकाच दिवसातील ही सर्वात मोठी दुसरी संख्या ठरली. जिल्ह्यातील एकूण ११९ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ९८ अहवाल नकारात्मक, तर २१ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २०७ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील १५ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूपैकी एकाने आत्महत्या केली आहे. आतापर्यंत ७२ जणांनी करोनावर मात केली. सद्यस्थितीत १२० करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, ११ जणांचे करोना तपासणी अहवाल सकारात्मक आले. त्यामध्ये खैर मोहम्मद प्लॉट, माळीपूरा येथील प्रत्येकी दोन व फिरदोस कॉलनी, आंबेडकर नगर, खदान, गोकूळ कॉलनी, तारफैल, खडकी, पोलीस वसाहत येथील रहिवासी रुग्णांचा समावेश आहे. त्यात नऊ पुरुष व दोन महिला आहेत. सायंकाळच्या अहवालात आणखी १० रुग्ण वाढले. त्यापैकी तीन जण आंबेडकर नगर, तर माळीपूरा, फिरदोस कॉलनी, खदान, शहर कोतवाली, सिव्हिल लाईन, मोमिनपूरा, नेहरू नगर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यात सात पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांना दाखल करून त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आणखी १२ जण करोनामुक्त
आज दिवसभरात उपचार पूर्ण झालेल्या १२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यातील पाच जण हे फतेह चौक या भागातील रहिवासी आहेत, तर तीन जण खैर मोहम्मद प्लॉट व मेहरनगर डाबकी रोड, नाहिदपुरा पिंजर, बैदपूरा, गुलजारपुरा येथील रहिवासी प्रत्येकी एक जण आहे. त्यात सात महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ७२ जण करोनामुक्त झाले आहेत.

आतापर्यंत १७७७ अहवाल नकारात्मक
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २२४८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २०३९, फेरतपासणीचे १०६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०३ नमुने होते. आजपर्यंत एकूण १९८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. आजअखेर एकूण १७७७ अहवाल नकारात्मक, तर २०७ जणांचे अहवाल सकारात्मक आले. अद्याप २६४ अहवाल प्रलंबित आहेत.