हरियाणात अडकलेल्या वर्ध्याच्या नवोदय विद्यालयातील २१ अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या परतीचा प्रवास आज अखेर निश्चिात झाल्याने पालकांचा जीव भांड्यात पडला आहे. विद्यार्थ्यांच्या आदान-प्रदान कार्यक्रमाअंतर्गत सेलूच्या नवोदय विद्यालयातील नवव्या वर्गाचे अकरा मुलं व दहा मुली हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातल्या जवाहर नवोदय विद्यालयात वर्षभरासाठी वास्तव्यास होते. करोनामूळे टाळेबंदी झाल्यावर हे सर्व सोनीपतलाच अडकून पडले.

अल्पवयीन मुलं परराज्यात अडकल्यामुळे पालकांना चिंता वाटत होती. अखेरीस पालकांनी खासदार रामदास तडस यांची भेट घेऊन मार्ग काढण्याची विनंती केली. खासदार तडस यांनी महराष्ट्र व हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे मुलांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष व्यवस्था करण्याची विनंती केली होती. तडस यांच्या हस्तक्षेपानंतर शनिवारी दुपारी, एका ट्रॅवल्स बसमधून या मुलांचा तसेच कला शिक्षक सुनील चांदूरकर व सौ चांदूरकर, श्रीमती लता मानकर यांचा परतीचा प्रवास लगेच सुरू झाला. ही बस उद्या रविवारी दूपारी बारा वाजता येथील नवोदय विद्यालयात पोहोचणार असल्याची माहिती खा. तडस यांनी दिली.