शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी त्यांच्या मातोश्री प्रमिलाबाई भोसले यांच्या दशक्रिया आणि उत्तर कार्यावर होणाऱ्या खर्चाची २१ हजारांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

रणजित भोसले यांच्या मातोश्रींचे दोन एप्रिल रोजी निधन झाले. सध्या करोनाच्या महामारीने सर्वत्र टाळेबंदी सुरु आहे. एरवी दशक्रिया विधी आणि उत्तर कार्य केले असते तर साधारणत: २० ते २५ हजार रुपयांचा खर्च आला असता.

भोसले यांनी साध्या पध्दतीने सर्व विधी आणि कार्य घरगुती स्वरूपात पार पाडले. यातून शिल्लक राहिलेले २१ हजार रूपये भोसलेंनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी करोनाग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यात भोसले यांनी ही रक्कम जमा केली आहे.