भंडाऱ्याच्या उसगावमध्ये एका घरात शिरलेल्या बिबट्याला २१ वर्षांच्या तरुणीनं मोठ्या हिमतीनं परतवून लावलं. यात तरुणी आणि तिची आई जखमी झाली आहे पण, संकटकाळी तिनं दाखवलेल्या प्रसंगावधानतेनं या दोघींचे प्राण थोडक्यात बचावले आहेत.

गेल्या आठवड्यात रात्रीच्या सुमारस रुपाली मेश्राम या तरुणीच्या घरात बिबट्या शिरला. अंगणात बांधलेल्या शेळीवर बिबट्यानं हल्ला केला होता. शेळीच्या आवाजानं रुपाली आणि तिची आई अंगणात आली. मात्र याचवेळी बेसावध असलेल्या दोघींवर बिबट्यानं हल्ला चढवला. रुपालीनं प्रसंगावधानता दाखवून काठीने बिबट्याला हुसकावून लावलं. अखेर या वाघीणीपुढे बिबट्यानं माघार घेत जंगलात धुम ठोकली. मात्र या हल्ल्यात रुपाली आणि तिची आई गंभीर झाली. रुपालीनं तातडीनं याची माहिती वनविभागाला दिली. वन अधिकाऱ्यांनी रुपाली आणि तिची आई जिजाबाई यांना प्राथमिक उपचारांकरता साकोली रुग्णालयात दाखल केले होते.

रुपालीची प्रकृती चिंताजनक होती. पण, आता मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. २१ वर्षांच्या तरुणीनं दाखवलेल्या धैर्याबद्दल तिचं राज्यभरातून कौतुक होत आहे.