राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी २१५ पोलीस करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. याचबरोबर राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता २३ हजार ३३ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले ३ हजार १०७ जण, करोनामुक्त झालेले १९ हजार ६८१ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २४५ जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील एकूण २३ हजार ३३ करोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार ५२१ अधिकारी व २० हजार ५१२ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार १०७ पोलिसांमध्ये ३८८ अधिकारी व २ हजार ७१९ कर्मचारी आहेत.

करोनातून बरे झालेल्या झालेल्या १९ हजार ६८१ पोलिसांमध्ये अधिकारी २ हजार १०८ व १७ हजार ५७३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या २४५ पोलिसांमध्ये २५ अधिकारी व २२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे.