संत गोरोबा काका साहित्य नगरी ,उस्मानाबाद : २१ व्या शतकाला जसे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने विकसित केले. त्याचप्रमाणे या काळात लिहिल्या गेलेल्या वास्तववादी लिखाणानेही समाजाला समृद्ध केले आहे आणि म्हणूनच ते वाचनीय आहे, असा सूर परिसंवादात व्यक्त झाला. २१ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे, या विषयावर आयोजित परिसंवादात या शतकातील एकूणच लिखाणाच्या प्रवासाचा धांडोळा घेण्यात आला.
चरित्र लिखाणावर बोलताना डॉ. कैलास इंगळे म्हणाले, मलालाला नोबेल पुरस्कार मिळाला म्हणून तिच्याबद्दलचे कुतूहल वाढले. या कुतुहलातून तिच्या आयुष्याबाबत वाचावे असे लोकांना वाटायला लागले. त्यातून तिचे चरित्र जन्माला आले. मलाला हे आजचे उदाहरण आहे म्हणून मी तिचा संदर्भ दिला. २१ व्या शतकातील चरित्र लिखाणाचा प्रवास प्रचंड समृद्ध आहे. अनंत देशमुख, शरद जोशी, शरद कोलारकर, रोहिणी गव्हाणकर या लेखकांनी चरित्र लिखाणाला एक वेगळे वलय प्राप्त करून दिले. हे चरित्र लिखाण वाचले गेले याचे श्रेय या लेखकांच्या लेखन कौशल्याचे यश आहे. जोपर्यंत जगभरातील प्रसिद्ध लोकांबाबतचे कुतूहल जिवंत आहे, तोपर्यंत चरित्र व आत्मचरित्रांचे वाचन थांबणार नाही, याकडेही इंगळे यांनी लक्ष वेधले.
चिंतनपर व ज्ञानवर्धक साहित्याबाबत बोलताना प्रा. संतोष गोणबरे म्हणाले, आज जितक्या क्षमतेने लिहिले जाते तितक्या क्षमतेने ते वाचले जाते का, हा आजच्या २१ व्या शतकातील खरा प्रश्न आहे. असे असले तरी चिंतनपर व ज्ञानवर्धक साहित्याला पर्याय नाही. समाज माध्यमांच्या आजच्या काळात वृत्तपत्रे फारशी वाचली जात नाहीत. परंतु चिंतनपर व ज्ञानवर्धक साहित्य ही आमच्या जीवनाची गरज आहे. ही गरज भागवायची असेल तर वृत्तपत्रे नेमाने वाचली पाहिजेत. समाजाची ही वाचनाची भूक लक्षात घेऊनच आजच्या संपादकांनी लिहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. या परिसंवादात डॉ. दत्ता घोलप यांनी कादंबरी, डॉ. पी. विठ्ठल यांनी कविता, डॉ. केशव तुपे यांनी कथा तर अभिराम भडकमकर यांनी नाटक या विषयांवर भाष्य केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 12, 2020 1:07 am