लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. सलग ११ व्या दिवशी मृत्यूचे सत्र सुरू असून, करोनामुळे आणखी तीन बळी गेल्याची नोंद आज झाली. मंगळवारी ३२ जणांचे करोना तपासणी अहवाल सकारात्मक आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १०७३ झाली. आतापर्यंत ५६ जणांचे मृत्यू झाले आहेत. गत सलग ११ दिवसांत २२ जणांचे मृत्यू झाले. दिवसांला सरासरी दोन मृत्यू होत असल्याने जिल्ह्यात अत्यंत चिंताजनक स्थिती आहे.

अकोला जिल्ह्यात करोनाचा प्रकोप अद्याापही थांबला नाही. रुग्ण वाढीसोबतच मृत्यूदर झपाट्याने वाढत आहे. शहरात ६ ते १६ जूनपर्यंत सलग ११ दिवसांत करोनाबाधितांचा दररोज मृत्यू होत आहे. या कालावधीत तब्बल २२ जण दगावले आहेत. मृत्यूदर वाढत असल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १३८ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी १०६ अहवाल नकारात्मक, तर ३२ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७३ झाली. सध्या रुग्णालयात ३४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, करोनामुळे आजही आणखी तीन मृत्यू नोंदवल्या गेले आहेत. काल (दि.१५) रात्री उपचार घेताना एक ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला रुग्ण अकोट फैल येथील रहिवासी होती. त्यांना १३ जून रोजी दाखल करण्यात आले होते. आज दुपारनंतर आणखी दोघांचा मृत्यू झाला. त्यात एक बाळापूर येथील ७४ वर्षीय पुरुष आहे. त्यांना १३ जून रोजी दाखल केले होते. बार्शिटाकळी येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचाही मृत्यू झाला. त्यांना २६ मे रोजी दाखल करण्यात आले होते. तिन्ही रुग्णाचा उपचारादरम्यान सर्वोपचार रुग्णालयात मृत्यू झाला.

आज दिवसभरात ३२ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. त्यात आज सकाळी प्राप्त अहवालात एकही रुग्ण आढळला नाही. सायंकाळच्या अहवालात ३२ जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात ११ महिला व २१ पुरुष आहेत. त्यातील सात जण चवरे प्लॉट, पाच जण बाळापूर, गुलजारपुरा, सिंधी कॅम्प, वाशीम बायपास, मोठी उमरी, तारफैल येथील प्रत्येकी दोन जण, तर शंकरनगर, अकोट फैल, खदान, इंदिरानगर वाडेगाव, डाबकी रोड, आदर्श कॉलनी, महाकाली नगर, खेतान नगर, चांदुर खडकी, खामखेड वाडेगाव रोड येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. करोनाबाधित आढळून आलेले परिसर तात्काळ प्रतिबंधित करून संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात आहे.

करोनातून बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत ६७६ रुग्णांची करोनावर मात केली आहे. त्याचे प्रमाण ६३ टक्के आहे. करोनातून ते बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात आज दुपारनंतर रुग्णालयातून सोडण्यात आलेल्या १८ जणांचा समावेश आहे. त्यातील १६ जणांना घरी पाठवण्यात आले तर उर्वरित दोन जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण ५.१२ टक्के
जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण चांगलेच वाढत आहे. सध्या अकोला जिल्ह्यात करोनाच्या ५.१२ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. राज्याच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. गत काही दिवसांपासून सलग रुग्ण दगावत असल्याने मृत्यूदर चांगलाच वाढला. मृत्यू रोखण्यात उपचार पद्धती निष्फळ ठरत असल्याचे चित्र आहे.