पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खालापूर, अकोल्यातील मलकापूर, नाशिकमधील वणी आणि संगमेश्वर तालुक्यातील आंबवली येथे सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनांमध्ये एकूण २२ जणांचा मृत्यू झाला, तर एकूण ३१ जण जखमी झाले. मृतांमधील चौघे मुंबईचे होते.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खालापूरजवळ  टेम्पो ट्रॅव्हलर बसने एका खासगी बसला धडक दिल्याने चालक कांबळे आणि जोसेफ सेरेजो यांचा मृत्यू झाला. या बसने वसई येथून १९ जण महाबळेश्वरला निघाले होते. बसच्या चालकाला माडप बोगद्याजवळ मार्गिकेवर थांबलेल्या खासगी बसचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. या अपघातात सेरेजा यांच्या कुटुंबियांसह १३ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी आठ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना कामोठेच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताने वसई येथील मेर्सेस गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ रखडली होती.

मलकापूर येथे कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने टाटा मॅक्स या प्रवासी मोटारीला चिरडले. मोटारीत १३ जण होते. मोटारीचा चेंदामेंदा झाल्याने त्या सर्वाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरच्या चाकाखाली अडकलेली मोटार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. तसेच मोटारीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी तिचे पत्रे कापावे लागले. या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नाशिकमध्ये सप्तशृंगी गडाहून देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या थांबलेल्या टेम्पोला मालमोटारीने धडक दिल्याने चार तरुणांचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले. त्यात महिला आणि मुलांचा समावेश आहे.

पंचवटीतील पेठरोड येथील सागर ठाकूर (वय २३), कुणाल ठाकूर (२५) आणि गणेश ठाकूर (३०) तसेच त्र्यंबकेश्वर येथील आशिष ठाकूर (३०) अशी मृतांची नावे आहेत.

तिघेजण डोहात बुडाले

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील आंबवली येथे सप्तिलगी नदीतील डोहात बुडून सोमवारी तिघांचा मृत्यू झाला. जनार्दन संभाजी पांचाळ (वय ४४, रा. मुंबई), रोशन जनार्दन पांचाळ (१४, रा. मुंबई) आणि ओंकार अनिल पांचाळ (१६) अशी मृतांची नावे आहेत. प्रसाद पांचाळ (२०) हा या दुर्घटनेतून बचावला आहे.  जनार्दन हे मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षक होते. पत्नी आणि मुलगा रोशनसह  ते मुंबईतच राहात होते. ते सुटीसाठी गावी आले होते. डोहात पोहत असताना ही दुर्घटना घडली.

मेर्सेस गावावर शोककळा

विरार : द्रुतगती महामार्गावर खालापूरजवळ झालेल्या अपघातात वसई येथील मेर्सेस गावातील जोसेफ सेरेजो मृत्युमुखी पडल्याने तसेच त्यांचे १८ आप्त गंभीर जखमी झाल्याने मेर्सेस गावावर शोककळा पसरली आहे. जखमींना पनवेलच्या एम.जी.एम  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सेरेजो कुटुंब सोमवारी सकाळी ५.३० च्या दरम्यान महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले होते. त्याच वेळी हा भीषण अपघात घडला. जोसेफ यांचा वसईत केटरिंग व्यवसाय होता तर त्यांची मुलगी शिक्षिका होती. त्यांचा मुलगा बाहेरगावी असतो.