लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : सदोष बियाणे प्रकरणी महाबीजने आतापर्यंत २२ लाख ३७ हजार रुपयांचा परताचा तक्रारदार शेतकºयांच्या खात्यात जमा केला आहे. तालुकास्तरीय समित्यांच्या अहवालानंतर ही प्रक्रिया करण्यात आली. सदोष सोयाबीन बियाण्यांमुळे या हंगामात शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीनचे राज्यातील सरासरी क्षेत्र ४० लाख हेक्टर आहे. त्यापैकी २० टक्के क्षेत्रावरील बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी आहेत. विदर्भातील १० हजारावर तर मराठवाड्यातील ४५ हजारावर शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सदोषमध्ये महाबीजसह अनेक नामांकित खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचाही समावेश आहे. त्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशा मागणीने जोर धरला.

दरम्यान, महाबीजने सदोष बियाण्यांच्या रकमेचा परतावा देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती असते. या समितीमध्ये तज्ज्ञांसह महाबीजच्या प्रतिनिधींचा समावेश असतो. तक्रारदार शेतकऱ्यांचे बियाणे सदोष असल्याचा निष्कर्ष समितीने दिला आणि तो महाबीजला मान्य असेल, तर संबंधित शेतकºयाला सदोष बियाण्यांचा परतावा दिला जातो. ही नेहमीची प्रक्रिया असल्याची माहिती महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी यांनी दिली. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना २२ लाख ३७ हजार रुपये परत करण्यात आले आहेत. तपासणीअंती १८ क्विंटल बियाण्यांच्या तक्रारी असल्याची माहिती त्यांनी दिली.

२०१३ पासून सदोष बियाणे प्रकरणी तालुकास्तरीय समितीकडून निष्कर्ष आल्यावर परतावा देण्याची प्रक्रिया करण्यात येते. यापूर्वी २०११, २०१४ मध्येही अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. अगोदरच्या हंगामात दिवाळीपर्यंत पाऊस लांबल्यास अशा प्रकारच्या तक्रारी येतात, असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी तक्रारी जास्त असल्याचे त्यांनी मान्य केले.

तालुकास्तरीय समितीने सदोष बियाणे असल्याचा निष्कर्ष काढल्यावर तो महाबीजला मान्य असल्यास त्या बियाण्यांचा परतावा देण्यात येत आहे. ही नियमित प्रक्रिया आहे.
– अनिल भंडारी, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज.