लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठय़ा प्रमाणावर नावे वगळल्याच्या तक्रारी मुंबई आणि पुण्यातून आल्याच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत २२ लाख नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे. अजूनही नावे नोंदविण्याची संधी असल्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मोठय़ा प्रमाणावर नावे मतदार याद्यांमधून वगळल्याच्या तक्रारी आल्या होत्या. नावे वगळण्यात आलेल्या २६ लाख मतदारांना आयोगाने पत्रे पाठविली होती व त्याबरोबरच नव्याने नोंदणीचा अर्जही पाठविला होता. पण यापैकी फक्त साडेचार लाख मतदारांकडेच स्पिड पोस्टने पाठविलेली पत्रे पोहचली. बाकीची सुमारे २० लाख पत्रे पत्ता सापडत नसल्याने परत आल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातील बहुसंख्य नावे ही बोगस असल्याचा निवडणूक आयोगाचा संशय आहे.
मुंबई व पुण्यात मतदार ओळखपत्र असतानाही मतदार याद्यांमधून नावे वगळल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेत फक्त ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रतीच्या आधारे नावांची मतदार याद्यांमध्ये पुन्हा नोंदणी करण्यात आली आहे. आयोगाने जून महिन्यात राबविलेली विशेष मोहीम, मतदारांमध्ये जागृती करण्याचा करण्यात आलेला प्रयोग या माध्यमातून नव्याने २२ लाख मतदारांची नोंदणी झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीच्या आधी दहा दिवसांपर्यंत सादर झालेले अर्ज स्वीकृत होतात. यामुळेच अजूनही नावे नोंदविलेली नसतील त्यांनी संबंधित शासकीय कार्यालयात नावे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.