जिल्ह्यात शनिवापर्यंत सुमारे २२ हजार ५१८ हेक्टर शेतावरील पिकांचे नुकसान झाले. मात्र, रविवारी पुन्हा झालेल्या गारपिटीमुळे नुकसानीचा आकडा वाढणार आहे. आतापर्यंत तिघांचा गारपिटीने बळी घेतला, तर १८ जणावरे दगावली. आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी रविवारी अनेक गावांतील शेतांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.
जिल्ह्यात ४ ते ८ मार्चदरम्यान ४ वेळा गारपिटीने तडाखा दिला. आधीच्या नुकसानीचा अहवाल तयार केला न केला, तोच रविवारी पाचव्यांदा गारांचा सडा पडला. नुकसानीचे सर्वेक्षण प्रशासनाकडून चालू आहे. गारपिटीमुळे २२ हजार ५१८.१० हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. िहगोली तालुक्यात ५ हजार ६९, कळमनुरी ६२७, सेनगाव ४ हजार ९८९, वसमत १ हजार ९१७ तर औंढा ७३७ याप्रमाणे १३ हजार ३४० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त, तर ९ हजार ७७९ हेक्टर शेतावरील पिकांचे ५० टक्क्य़ांपेक्षा कमी नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने तयार केला. रविवारी झालेल्या गारपिटीमुळे नुकसानीच्या आकडय़ात निश्चितच वाढ होणार आहे. रविवारी गारांच्या पावसात िहगोली तालुक्यातील मौजा येथील शाळेवरील टिनपत्रे उडून गेले, चिंचोली येथील एका शेतकऱ्याच्या िलबोणीची झाडे मुळासकट पडली. चिंचोली गावात विजेचे खांब पडून घरांचे मोठे नुकसान झाले.
जिल्ह्यात सर्वसाधारण १ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली होती. यातील ७९ हजार हेक्टर हरभरा, ३० हजार हेक्टर गहू, ३० हजार हेक्टर ज्वारी आदी पिकांची पेरणी करण्यात आली. मात्र, शनिवापर्यंत २२ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. रविवारी झालेल्या पीक नुकसानीचे सर्वेक्षण सुरू आहे. गहू, रब्बी ज्वारी, हरभरा ही संपूर्ण पिके हातून गेली. मोसंबी, संत्रा, िलबू, आंबे या फळबागा पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या. केळीचे पीकहातचे गेले. आमदार गोरेगावकर यांनी रविवारी वडद, आंबाळा, वायचाळ िपपरी, आंबाळा तांडा, सवना, गोरेगाव आदी भागातील शेतीच्या पीक नुकसानीची पाहणी केली. जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, तहसीलदार विद्याचरण कडवकर, सेनगावचे तहसीलदार मेडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार यांनी अनेक गावांना भेटी देऊन पाहणी केली.