ठाण्यातील आरटीओ ऑफिसजवळ एका २२ वर्षांच्या तरूणीवर एका तरूणाने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात ही मुलगी गंभीर जखमी झाली. हल्ला करून हा तरूण पसार झाला. या तरूणीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आकाश पवार असे तरूणाचे नाव आहे. त्याने २२ वर्षांच्या या तरूणीवर हल्ला का केला ही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. प्राची विकास झाडे असे या तरूणीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचीही माहिती मिळते आहे. आता पोलीस पुढील तपास करत आहेत.

प्राची ही कोपरी कॉलनी येथील किशोर नगर परिसरात राहात होती. ठाण्यातील बेडेकर कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षाला शिकणारी प्राची नोकरीही करत होती. सकाळी ती बाईकवरून ऑफिसला जायला निघाली. पूर्वद्रुतगती मार्गावरून जात असतना आकाश पवार (वय २५ रा. भिवंडी) याने तिच्यावर चाकूने वार केले. काहींनी या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हातात चाकू असताना कोणीही पुढे सरसावले नाही.

प्राचीला रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हल्ल्याची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. आकाश आणि प्राची हे दोघे एकमेकांना तीन वर्षांपासून ओळखत होते. त्यांच्यात प्रेमसंबंधही होते. मात्र काही कारणामुळे या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता अशीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आकाशला अटक केली आहे अशीही माहिती मिळते आहे.

आकाशने प्राचीला जून महिन्यातही मारहाण केली होती. तसेच तिला धमक्याही दिल्या होत्या. याबद्दल प्राचीने पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचीही माहिती समोर आली आहे. प्राचीच्या कुटुंबीयांनी आकाशला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.