राज्यातील दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व तलाव भरून घेण्यासाठी १०५ उपसा जलसिंचन योजना राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी २२०० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविला असून तो मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगली येथे व्यक्त केले. जत पूर्व भागासाठी व आटपाडी तालुक्यात पिण्याचे पाणी देण्यासाठी ७३ कोटी रुपये देण्याबाबत कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सांगली येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या कै. गुलाबराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरप्रसंगी आयोजित सहकार मेळाव्यात मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम होते. केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील आदी यावेळी उपस्थित होते.