15 July 2020

News Flash

२२ हजार नागरिकांचे स्थलांतर

वसई, डहाणू व पालघर तालुक्यात व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता खबरदारी म्हणून किनारपट्टी परिसरात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

चक्रीवादळापूर्वीची सतर्कता; वसई, डहाणू व पालघर तालुक्यात व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश

पालघर : अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळाच्या संभाव्य धोका लक्षात घेता त्यावर उपाय करण्यासाठी जिल्ह्य़ातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २२ हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास प्रशासनाने आरंभ केला आहे. याखेरीज वसई, पालघर व डहाणू या तीन तालुक्यांमधील सर्व व्यापारी व औद्योगिक आस्थापने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे  यांनी दिले आहेत.

जिल्ह्याच्या किनारपट्टीवर असलेल्या ६२ गावांपैकी  चार तालुक्यांतील २२ गावे चक्रीवादळाच्या तडाख्यात बाधित होण्याची शक्यता असल्याने त्याठिकाणी कच्ची घरे, धोकादायक इमारती तसेच असुरक्षित ठिकाणी राहणाऱ्या सुमारे २२ हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम मंगळवार सायंकाळपासून हाती घेण्यास सुरुवात केली आहे.  खबरदारी म्हणून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दोन तुकडय़ा जिल्ह्यात दाखल झाल्या  आहेत.  पालघर व डहाणू येथील किनारपट्टीच्या गावांची त्यांनी पाहणी केली आहे.  तीन जून रोजी जिल्ह्य़ातील समुद्रकिनारी असलेल्या वसई, पालघर व डहाणू तालुक्यातील सर्व उद्योग, आस्थापना, सर्व दुकाने, खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. वसई, पालघर, डहाणू तालुक्यांना अतिवृष्टीचा इशारादेखील देण्यात आलेला आहे. चक्रीवादळाच्या अनुषंगाने औद्योगिक आस्थापनांनी कारखान्यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून योग्य ती दक्षता घ्यावी व त्यामधून कोणतेही रसायन अथवा वायू यांचे उत्सर्जन होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे. या कालावधीत तीन तालुक्यांतील अत्यावश्यक सेवा व दुकाने सुरू राहतील असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

अशी काळजी घ्या!

* घराची तपासणी करावी. सुटे सामान सुरक्षित ठेवावे, दरवाजे व खिडक्या दुरुस्त करून घ्याव्यात,

* घराच्याजवळ असलेले वाळलेले लाकूड किंवा वाळलेली झाडे काढून टाकावीत.

* जोराच्या वाऱ्याने उडून जाऊ  शकतात, अशा ओंडक्यांच्या राशी, सुटय़ा पत्र्याचे निवारे, सुटय़ा विटा, कचऱ्यांचे डबे, नामफलक वस्तू बांधून ठेवाव्यात.

* काही लाकडी फळ्या तयार ठेवाव्यात, जेणेकरून जर आवश्यकता पडली तर काचेच्या खिडक्यांना आच्छादित करता येईल.

* केरोसिनने भरलेल्या मोठय़ा वाऱ्यातसुद्धा न विझणारा दिवा (कंदील) बॅटरीवर चालणारी विजेरी आणि पुरेसे (ड्रायसेल) शुष्क घट तयार ठेवावेत.

* ट्रान्झिस्टर (रेडिओ) करिता काही जास्त बॅटऱ्या ठेवाव्यात.

* संकटकालीन वापराकरिता कोरडे खराब न होणारे खाद्यपदार्थ नेहमीच तयार ठेवावेत.

स्थलांतरीत निवारा छावणीत

पालघर : जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावामधील चक्रीवादळामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे  स्थलांतरण निवारा छावण्यामध्ये करण्यात येणार आहे. निवारा छावनीत आसरा देण्यात येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, अन्न, स्वच्छता व आरोग्य सेवा तसेच औषधांचा योग्य पुरवठा करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. या सुविधा सुरळीतपणे देण्याकरिता सर्व गटविकास अधिकारी यांच्याशी  समन्वय साधण्याकरिता जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

अफवांना उधाण

पालघर : करोनाच्या पार्श्वभूमीवर अफवांनाही उधान आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. पालघर नगर परिषदेने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पालघर नगर परिषद क्षेत्रातील जीवनावश्यक व इतर सेवा तसेच दुकाने ही सकाळी नऊ  ते संध्याकाळी पाच वाजेपासून सुरू ठेवण्याचे आदेश दिले असले तरी काही नागरिकांमार्फत नगरपरिषद क्षेत्रात फिरून वादळाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक व इतर सेवा तसेच दुकानांना दहा  ते चार वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवा असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसह हे दुकानदार संभ्रमात पडले आहेत. असे चुकीचे संदेश देणाऱ्या व चुकीच्या अफवा पसरवणाऱ्यावर नगरपालिकेने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

मदतीसाठी नियंत्रण कक्ष

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष येथे ०२५२५-२९७४७४/ ०२५२५-२५२०२०  तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (विवेकानंद कदम) यांना  ८३२९४३९९०२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

उत्तनमधील दोन हजार  नागरिकांचे स्थलांतर

उत्तन किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात नागरिक वास्तव करत आहेत. त्यामुळे अशा साधारण दीड ते दोन हजार नागरिकांना स्थलांतरीत करून वेलंकनी चर्च व  सेंट जोसेफ स्कूल येथे राहण्याची  सुविधा करण्यात आली आहे.

वसईतील १२ गावांना धोका

चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका वसईतील किनारपट्टीवरील १२ गावांना बसण्याचा धोका वर्तविण्यात येत आहे.  हवामान खात्याच्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्यातील चार तालुके प्रभावित होणार आहेत. यामध्ये वसईतील १२, पालघरमधील ५, डहाणूतील ४ आणि तलासरीमधील १ गावाचा समावेश आहे. सर्वाधिक फटका वसई तालुक्यातील चांदीप, पाचूबंदर, सायवन, कामण, ससूननवघर, अर्नाळा, अनाळा किल्ला, रानगाव, सत्पाळा, कळंब, राजोडी, भुईगाव बुद्रुक या १२ गावांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येते.  पालघर तालुक्यातील सातपाटी, जलसारंग, मुरबे, उच्छेळी, दांडी ही पाच गावे, डहाणू तालुक्यातील डहाणू, नरपड, आंबेवाडी, चिखले ही चार गावे तर तलासरीमधील झाई गावाला फटका बसण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

मीरा-भाईंदर महापालिका सज्ज ; उत्तन किनाऱ्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक

भाईंदर : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महानगरपालिका सज्ज असून जीवितहानी टाळण्याकरिता आवश्यक पावले उचलण्यात आली असल्याचे दिसून आले आहे.  उत्तनच्या समुद्रकिनाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापक पथक तैनात करण्यात आले आहे. भाईंदर पश्चिम परिसरात विस्तीर्ण समुद्रकिनारा असल्यामुळे मोठय़ा प्रमाणात मच्छीमार कुटुंब या भागात वास्तव्य करत आहेत. चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय घेण्याकरिता संपूर्ण यंत्रणेला  सतर्क केले आहे. त्याच प्रकारे मासेमारी बंद करण्यात आली असली तरी मच्छीमारांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच जिल्ह्य़ातील किनारपट्टी भागातील सर्व उद्योगांना आपली आस्थापने बंद करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. उत्तन किनाऱ्यावर केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले.

तसेच स्थानिक महानगरपालिकेकडून रुग्णवाहिका उभ्या करण्यात आल्या आहेत. त्याच प्रकारे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या कार्यकाळात मुसळधार पाऊस झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची तयारी सुरू करण्यात आली आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:36 am

Web Title: 22000 citizens shifted to safest place ahead of severe cyclonic storm zws 70
Next Stories
1 भूमाफियांकडून वनईमधील टेकडीचे सपाटीकरण
2 शिमला मिरचीला ‘करोनाची बाधा’
3 वऱ्हाड निघालंय विलगीकरणाला!
Just Now!
X