महाराष्ट्रात दिवसभरात २२१ नवे करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज करोनामुळे महाराष्ट्रात २२ रुग्णांचा मृत्यू झाला. २२ मृत रुग्णांपैकी १६ मृत्यू मुंबईत, ३ पुण्यात तर २ नवी मुंबईत झाले आहेत. तर एका मृत्यूची नोंद सोलापुरात झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी ही बातमी ठरली आहे.

महाराष्ट्रात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. खासकरुन मुंबईत ही संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत महाराष्ट्रातल्या एकूण रुग्णांपैकी निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत. धारावीमध्ये करोनाची लागण होऊन आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्क्रिनिंग सुरु करण्यात आलं आहे. तसंच धारावीसाठी वेगळा कृती आराखडाही आखण्यात आला आहे. याद्वारे येथील रुग्णांची तसेच नागरिकांची सर्वतोपरी काळजी घेतली जाते आहे.

राज्यात रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन असे करोनाग्रस्तांचे तीन झोन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे पुणे, नाशिक ही प्रमुख शहरं रेड झोनमध्ये आहेत. १५ पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या ठिकाणी रेड झोन, त्यापेक्षा कमी रुग्ण असलेल्या ठिकाणी ऑरेंज झोन आणि रुग्ण नसलेल्या ठिकाणी ग्रीन झोन असे वर्गीकरण करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्रातला लॉकडाउन हा ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. स्वयंशिस्त पाळा, गरज असेल तरच बाहेर पडा, लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोर पालन करा, मास्क लावूनच बाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे. तसंच तुम्ही खबरादारी घ्या आम्ही शासन म्हणून जबाबदारी घेतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.