जिल्ह्यात नवे २,२५६ रुग्ण, ४२ बाधितांचा मृत्यू

कराड : सातारा जिल्ह्यात झेपावणारी करोना रुग्णवाढ आणि करोनाबळींचा आकडा गेल्या पाच दिवसात काहीसा कमी होऊन स्थिरावण्याची आशा होती. परंतु, गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्या व मृतांचा आकडाही उच्चांकी झेपावल्याने करोना परिस्थिती गंभीर वळणावर पोचली आहे. वाढती रुग्णसंख्या व तुलनेत मृतांचाही आकडा वधारत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण अगदीच वाढणार असून, लोकांमध्ये संशय, भय अन् चिंता दाटली आहे.

काल बुधवारी १,८१० नवे करोनाबाधित समोर येताना, ३४ बाधितांचा मृत्यू झाला होता. आज करोनाबाधितांची हीच संख्या २,२५६ वर पोचताना ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. गतवर्षीच्या तुलनेत रुग्णवाढीचा हा दर २०९ टक्क्यांवर म्हणजेच दुपटीहून अधिक झेपावला आहे. करोना संसर्गाचा हा विस्फोट पाहता शासन, प्रशासन व आरोग्य यंत्रणा त्यास कशी तोंड देते हे महत्त्वाचे ठरणार आहे. तर, करोना प्रतिबंधासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणेही अधिक महत्त्वाचे आहे. मात्र, करोनास्थिती गंभीर वळणावर असतानाही अनेक ठिकाणचा लोकांचा बेफिकीरपणा पाहता करोनाला अटकाव कसा बसणार हा सध्याचा सतावणारा प्रश्न बनला आहे.

सातारा जिल्ह्यात आजवर करोना संशयित म्हणून ५,२७,१७५ जणांच्या चाचण्या, तपासण्या करण्यात आल्या असता त्यात १,००,७८८ जण करोनाबाधित निष्पन्न झाले. रुग्ण निष्पन्नतेचा हा सरासरी दर १९.११ टक्के राहिला आहे. परंतु, सध्याचा रुग्ण निष्पन्नतेचा वेग ३४ टक्क्यांवर पोचल्याची बाब गंभीर आहे. निष्पन्न रुग्णांपैकी मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण २.४४ टक्के असून, करोनाबळींची ही संख्या २,४६४ झाली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ व करोनाबळींची संख्या झेपावली असल्याने रुग्णालयातील सेवा-सुविधा तोकडय़ा पडण्याची भीती आहे. त्यात प्राणवायूचा तुटवडा भासण्याचीही शक्यता व्यक्त असलीतरी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी त्याबाबत कमालीची सतर्कता दाखवत प्राणवायू कमी पडणार नाही अशी व्यवस्था केल्याचे दिसते