News Flash

वाशिममध्ये निवासी शाळेतील २२९ विद्यार्थ्यांना करोनाची लागण; जिल्ह्यात खळबळ

जिल्ह्यातील देगाव येथील प्रकार

वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील आदिवासी निवासी शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतीगृहात राहणारे तब्बल २२९ विद्यार्थी दोन दिवसांत करोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीने या निवासी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

देगाव येथील आदिवासी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी दोन दिवसांमध्ये चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि २२९ विद्यार्थी बाधित आढळून आले आहेत. भावना पब्लिक स्कूल येथील वसतीगृहाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. बाधित आढळलेले सर्व विद्यार्थी शाळेच्या वसतिगृहात निवासी स्वरुपात राहणार आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्याातील १५१, यवतमाळ जिल्ह्याातील ५५, वाशीम जिल्ह्याातील ११, बुलढाणा जिल्ह्याातील तीन, अकोला जिल्ह्याातील एक, हिंगोली जिल्ह्याातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

करोनाबाधित विद्यार्थ्यांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने दोन डॉक्टरांसह दोन आरोग्य पथके निवासी शाळेमध्ये तैनात ठेवावीत. तसंच शाळा व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचे एक पथक ठेवावे. कोणत्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेऊन गट शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

शाळेमध्ये निवासी स्वरुपात राहणाऱ्या व बाधा न झालेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. बाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले इतर स्थानिक विद्याार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. करोनाबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना थोडीशी सर्दी आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षणे अथवा त्रास जाणवत नसल्याचे आरोग्य अधिकाºयांनी सांगितले आहे.

वाशीम जिल्ह्यात तब्बल ३१८ बाधित
वाशीम जिल्ह्यामध्ये करोनाचा उद्रेक वाढत असून बुधवारी तब्बल ३१८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये देगाव येथील निवासी शाळेतील १९० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला असून ३० जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2021 11:50 am

Web Title: 229 students found corona positive in washim sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Pooja Chavan: “लाज वाटली पाहिजे तुम्हाला…,” पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या चित्रा वाघ संतापल्या
2 महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट येणार की नाही, पुढील दहा दिवसात ठरणार : करोना टास्क फोर्स
3 “…म्हणून मृत्यूआधी स्टेडिअम आपल्या नावे करुन घेतलं”; प्रकाश आंबेडकरांची मोदींवर बोचरी टीका
Just Now!
X