सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कौटुंबिक मालमत्ता २३ कोटी ४७ लाखांची असल्याचे शिंदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. यात त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना रायगड जिल्ह्य़ातील रोहा येथे बांधकामासाठी जावयाने पाच कोटींची भेट दिल्याचा उल्लेखही शपथपत्रात करण्यात आला आहे. तसेच शिंदे यांनी जुनी वापरती टोयोटा फॉच्र्युनर कार दहा लाखात खरेदी केल्याचे म्हटले आहे.
शिंदे कुटुंबीयांकडे जंगम मालमत्ता ८ कोटी ५७ लाख ९९ हजार ३३२ रुपयांची तर स्थावर मालमत्ता १४ कोटी ८९ लाख १४१० रुपयांची आहे. यात स्वत: शिंदे यांच्याकडे ६ कोटी १७ लाख ९४ हजारांची जंगम आणि ५ कोटी ८० लाख १३ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांनी २ कोटी ४० लाख ४५३८ रुपयांची जंगम मालमत्ता व ९ कोटी ८ लाख ८८ हजारांची स्थावर मालमत्ता बाळगल्याचा समावेश आहे. शिंदे दाम्पत्य शेतकरी असून त्यांचे टाकळी (ता.दक्षिण सोलापूर) येथे सुमारे ३२ एकर क्षेत्रात जाई-जुई फार्म हाऊस आहे. शिवाय त्याच ठिकाणी १३ हजार चौरस फुटांचा अकृषक भूखंड आहे. तसेच रायगड जिल्ह्य़ातील रोहा तालुक्यात कोलाड येथे दोन लाख २० हजार चौरस फुटांचा अकृषक भूखंड असून त्याची किंमत दोन कोटी ३ लाख इतकी आहे. या भूखंडावर बांधकामासाठी जावयाने पाच कोटींची रक्कम भेटीच्या स्वरूपात दिल्याचेही शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. सोलापुरात विजापूर रस्त्यावर जाई-जुई बंगला (किंमत १८ लाख ७९ हजार), पुण्यात एरंडवणे येथे ३२५० चौरस फुटांचा भूखंड (तीन कोटी ३४ लाख), मुंबईत पालीहिल येथे सदनिका (तीन कोटी ११ लाख) व नवी दिल्लीत मुनिर्का विहारात १२०० चौरस फुटांची सदनिका (एक कोटी २५ लाख) या मिळकती शिंदे कुटुंबीयांनी बाळगल्या आहेत. ठेवींच्या स्वरूपात शिंदे यांनी पाच कोटी ९३ लाखांची तर उज्ज्वला यांनी एक कोटी ९७ लाखांची रक्कम ठेवीच्या स्वरूपात विविध बँकांमध्ये गुंतविली आहे.
आतापर्यंत शिंदे यांच्याकडे जुनी प्रीमियर फियाट मोटार होती. ती आता बदलून त्याची जागा टोयोटा फॉच्र्युनर कारने घेतली आहे. परंतु ही आलिशान कार २०१० सालच्या मॉडेलची असून त्याची खरेदी चालू वर्षी केवळ दहा लाखांत करण्यात आली आहे. याशिवाय शेतात वापरण्यासाठी ट्रॅक्टर, विजेसाठी जनरेटर आणि पत्नीच्या नावे टेम्पो वाहन आहे. शिंदे दाम्पत्याकडे ९५५ ग्रॅम सोने असून त्याची किंमत २९ लाख १२ हजारांएवढी आहे. स्वत: शिंदे यांनी भविष्य निर्वाह निधीपोटी ४४ लाख ७९ हजार तर राष्ट्रीय बचत पत्रापोटी ४० हजारांची रक्कम गुंतविली आहे, तर पत्नी उज्ज्वला यांनी भविष्य निर्वाह निधीमध्ये ६ लाख ४५ हजारांची रक्कम गुंतविली आहे.