मेघालय राज्यातील सीएमजे विद्यापीठातून बनावट पदव्या घेणाऱ्यांमध्ये नागपूर व गोंडवाना विद्यापीठातील नऊ शिक्षकांचा समावेश असून, राज्यातील इतरही विद्यापीठांमध्ये मिळून असे २३ ‘बनावट’ शिक्षक असल्याचे आतापर्यंत उघडकीला आले आहे. दरम्यान, अनेक अनियमितता असणारे हे विद्यापीठ बरखास्त करण्यात यावे, अशी शिफारस मेघालयाच्या राज्यपालांनी केली आहे.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये अध्यापन करणाऱ्या काही शिक्षकांनी शिलाँग येथील चंद्रमोहन झा (सीएमजे) विद्यापीठातून बनावट पदव्या घेतल्याचा प्रकार चव्हाटय़ावर आल्याने खळबळ माजली होती. राज्यात असे २३ अधिव्याख्याते असल्याचे चौकशीत उघडकीस आले आहेत. यापैकी गोंडवाना विद्यापीठात सहा, तर नागपूर विद्यापीठात तीन असे एकूण नऊ नागपूर विभागातील आहेत. सोलापूर विद्यापीठात असे सात, तर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तीन अधिव्याख्याते आढळले असून या सर्वाच्या नियुक्त्या शासनाने रद्द केल्या आहेत. याशिवाय सीएमजे विद्यापीठाची पदवी असलेल्या आणखी २० उमेदवारांनी अमरावती, कोल्हापूर आणि औरंगाबादच्या डॉ. आंबेडकर विद्यापीठात नोकरीसाठी अर्ज केला होता, परंतु त्यांचा विचार करण्यात आला नाही, अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. दरम्यान, सीएमजे विद्यापीठ बरखास्त करण्यात यावे, अशी शिफारस तेथील कुलपती असलेल्या राज्यपालांनी केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मेघालय सरकारने राज्यपालांची शिफारस राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या नियामक मंडळाकडे पाठवली आहे. विद्यापीठाच्या कामकाजात मोठय़ा प्रमाणावर अनियमितता असल्याबाबत सीआयडीने दिलेल्या अहवालावर आधारित असलेल्या राज्यपालांच्या सूचनांमध्ये तथ्य असल्याचे मंडळाला आढळले आहे. हा अहवाल नंतर मेघालय मंत्रिमंडळाला पाठवण्यात आला असून ते लवकरच याबाबत निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या ४ जून रोजी एक परिपत्रक जारी करून, सीएमजे विद्यापीठाचे पदवीधारक असलेल्या सर्व विद्यापीठातील शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द कराव्या आणि नव्या नियुक्त्या देऊ नयेत, असा आदेश जारी केल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. दरम्यान, सीएमजे विद्यापीठाच्या पीएच. डी. पदव्या असलेल्या २३ उमेदवारांची नावे आतापर्यंत राज्याच्या उच्च शिक्षण विभागाला कळली असल्याचे या विभागाचे संचालक बी. आर. गायकवाड यांनी म्हटले आहे.
नागपूर विभागाचे शिक्षण सहसंचालक डी. बी. पाटील यांनी या संदर्भात परिपत्रक जारी केल्यानंतर फक्त दोन विद्यापीठांनी त्याला प्रतिसाद दिला. सीएमजे विद्यापीठाची पदवी असलेले कुणीही कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात आढळले नाही, तर गोंडवाना विद्यापीठाने अशी सहा नावे कळवली. नवीन उमेदवार असलेल्या चौघांनी अधिव्याख्याता पदासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांना मान्यता देण्यात आली नाही. उरलेले दोघे एका विनाअनुदानित शिक्षण महाविद्यालयात काम करत आहेत, असे पाटील यांनी सांगितले. तथापि, आतापर्यंत असे तीन शिक्षक आढळलेल्या नागपूर विद्यापीठाने अद्याप परिपत्रकाला प्रतिसाद दिलेला नाही असेही ते म्हणाले.