महेश बोकडे

राज्यातील काही भागांत करोनाचा उद्रेक पुन्हा सुरू झाला असून रुग्ण वाढल्यावरही नागपूर महापालिका क्षेत्रात २२ फेब्रुवारीला रुग्ण दुपटीचा दर १५४.५६ दिवस आहे. अमरावती व अकोला या दोन महापालिका क्षेत्रांतील स्थिती गंभीर असून येथे अनुक्रमे रुग्ण दुपटीचा दर दोन आकडी संख्येत म्हणजेच २३.७१ आणि ३९.५४ दिवसांवर आला आहे.

अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्य़ांत करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांत झपाटय़ाने वाढत आहे. त्यावर नियंत्रणासाठी शासनाच्या सूचनेवरून तेथील जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. राज्यातील इतरही काही महापालिका हद्दीत हीच स्थिती आहे. रुग्णवाढीमुळे रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, मुंबई महापालिका क्षेत्रात रुग्ण दुपटीचा दर २२ फेब्रुवारीला २८९.३२ दिवसांवर तर ठाण्यात २९७.६८, नवी मुंबईत ३७०.९३, कल्याण डोंबिवलीत ३५५.३०, उल्हासनगर महापालिका हद्दीत ९५३.१८ दिवस, भिवंडीत १,८६२.१०, मीरा भाईंदरला ५३२.६५, वसई विरारला ९२४.०७, पनवेलला ३७८.२३, नाशिक महापालिका क्षेत्रात ३२०.४३, मालेगाव महापालिका हद्दीत २६०.०६, अहमदनगर महापालिकेत ४९५.३४, धुळे महापालिकेत २०६.०४, जळगाव महापालिका १३२.६४, पुणे महापालिका ३११.७७, पिंपरी चिंचवडला ३२४.६१, सोलापूरला ३०४.६१, कोल्हापूरला १,३२०.०२, सांगलीला १,७१७.१९, औरंगाबादला १९१.१७, परभणीला १३३.५३, लातूरला १२८.८०, नांदेडला ३३८.९४, चंद्रपूरला ५६१.८० दिवस नोंदवला गेला. या वृत्ताला एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दुजोरा दिला.