लोकसत्ता वार्ताहर
यवतमाळ : जिल्ह्यात गुरूवारी दिवसभरात २३ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर विलगीकरण कक्षात भरती असलेले १३ जण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या २३ जणांमध्ये १० पुरूष व १३ महिलांचा समावेश आहे. यात पुसद शहरातील उम्मद नगर येथील एक महिला, यवतमाळ शहरातील तायडे नगर येथील एक महिला, दत्तमंदिर वडगाव येथील तीन महिला आणि एक पुरुष, यवतमाळ शहरातीलच आर्णी रोड येथील एक महिला, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील एक पुरूष, पुसद येथील तीन पुरूष व दोन महिला, वणी येथील दोन महिला, दारव्हा येथील एक महिला व एक पुरूष आणि यवतमाळ येथील चार पुरुष व दोन महिला पॉझेटिव्ह आल्या आहेत.

जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४ झाली आहे. गत २४ तासात वैद्यकीय महाविद्यालयाला ३४८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २३ पॉझिटिव्ह आणि ३१९ अहवाल निगेटिव्ह असून सहा अहवालांचे अचूक निदान होणे बाकी आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगिकरण कक्षात ११६ जण भरती आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ३७९ वर गेला आहे. यापैकी २७२ जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात १३ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज ३४ नमूने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण सहा हजार ५०१ नमूने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी सहा हजार २७५ प्राप्त तर २२६ अहवाल अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार ८९६ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.