जिल्ह्यात २४ तासात करोनाचे २३ नवीन रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील रुग्ण संख्या २१५ वर पोहचली आहे. मृतांचा आकडा २५ वर गेला असून, बरे झालेल्यांची संख्या ९७ आहे.

शुक्रवारी मध्यरात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ११ नवीन रुग्ण आढळले. त्यात धुळे शहरातील सहा, दोंडाईचातील दोन, तर शिरपूर मधील तीन रुग्णांचा समावेश आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. साक्री तालुक्यातील धमनार येथील ५० वर्षांच्या व्यक्तीचा हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला.

धुळे आणि शिरपूर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे शहरांमध्ये दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी दुकाने, बाजारपेठा सुरू करण्यात आल्याने खरेदीसाठी गर्दी होत आहे. ही गर्दी करोनाचा संसर्ग वाढीसाठी कारणीभूत ठरण्याचा धोका आहे. आतापर्यंत करोनामुक्त असलेल्या दोंडाईचा शहरातही दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संपूर्ण दोंडाईचा शहर प्रतिबंधित करण्यात आले आहे.

शिरपूर शहरातही रूग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील बाधित कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ५१ वर्षांच्या परिचरावर १५ दिवसांपासून शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. सुरूवातीला त्यांचा अहवाल नकारात्मक आला होता.

प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्यूनंतर त्यांचा पुन्हा नमुना घेण्यात आला. त्याचा अहवाल शनिवारी सकारात्मक आला. त्यांच्या मृतदेहावर धुळ्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. शिरपूर शहरात ४७ आणि ग्रामीण भागात सात याप्रमाणे एकूण ५४ रुग्ण शिरपूर तालुक्यात आढळले आहेत. त्यात सहा जण करोनामुक्त झाले असून सहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.