जिल्ह्य़ातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी आता प्रचार मोहिमेला जोरदार सुरुवात झाली आहे. ८३ पैकी ५९ ग्रामपंचायतींत चुरस निर्माण होत आहे. परंतु तब्बल २३ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या. निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी या वेळी प्रथमच उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरणे बंधनकारक केले. त्याचा हा परिणाम असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जिल्ह्य़ात ८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ३३ ठिकाणी पोटनिवडणुका होत आहेत. दि. ४ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. परंतु हे अर्ज ऑनलाइन भरण्याचे सक्त आदेश असल्याने उमेदवार अपेक्षेप्रमाणे परावलंबी झाले. पहिले तीन दिवस तर आयोगाचे संकेतस्थळ उघडलेच नसल्याने व्यर्थ गेले. त्यानंतर अखेरच्या दिवशी ८ डिसेंबरला प्रचलित मॅन्युअली पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची मुभा मिळाली. त्यानंतर जे चित्र समोर आले, त्यानुसार मुखेड आणि लोहा या सारख्या राजकीयदृष्टय़ा संवेदनशील भागातील अनेक ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने प्रशासनही अवाक झाले.
सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या ८३ ग्रामपंचायती व ३३ पोटनिवडणुकांच्या जागा असे मिळून एकूण ७१० उमेदवार निवडून देणे अभिप्रेत होते. परंतु तब्बल २८२ प्रभागांत प्रतिस्पर्धीच उरला नाही. परिणामी त्या जागा बिनविरोध आल्याची औपचारिक घोषणा तेवढी शिल्लक आहे. अर्थात, ५९ ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणुका होत असून, तब्बल २३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने तेथील चुरसच संपुष्टात आली. मुखेडमध्ये २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. परंतु तब्बल ८४ प्रभागांत प्रतिस्पर्धीच उतरला नाही. त्यामुळे येथील उमेदवार लढाईपूर्वीच निवडून आले. या तालुक्यातील ८ ग्रामपंचायती बिनविरोध आहेत.
लोहा तालुक्यातही १० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. परंतु ३५ प्रभागांत प्रतिस्पर्धीच उतरला नाही. त्यामुळे या जागांचा प्रश्न अगोदरच निकाली निघाला. दहापैकी ४ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्याने ६ ठिकाणी निवडणूक प्रक्रिया होत आहे.
ऑनलाइनमुळे अनेक गावांत
राजकारणाचीच ऑफलाइन!
जेथे मतदान होणार आहे, तेथे वातावरण तापत चालले असून ‘मोदी मोदी’चा गजर ग्रामीण भागातही पोहोचल्याचे दिसून येते. नव्याने निवडून आलेले आमदार हिवाळी अधिवेशनातून सवड काढून ग्रामपंचायतीच्या राजकारणात लक्ष घालताना दिसून येत आहेत. ऑनलाइनमुळे अनेक गावांतील राजकारणाचीच ऑफलाइन झाल्याने हौसे, गवसे, नवश्यांची तोंडे मात्र पाहण्यासारखी झाली आहेत.