हर्षद कशाळकर

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसून दीड महिन्यानंतरही श्रीवर्धन तालुक्यातील २३ गावे अजूनही अंधारात आहेत. तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आलेले नाही.

३ जूनला दुपारी १२ वाजता निसर्ग चक्रीवादळ श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. वादळाने श्रीवर्धन तालुक्यात बहुतांश गावांना तडाखा दिला. हजारो घरांची पडझड झाली. धान्यही भिजले. रस्ते वाहतूक आणि संपर्क यंत्रणा कोलमडल्या, विजेची यंत्रणा कोलमडली. या घटनेला दीड महिना पूर्ण झाला तरीही नागरिकांचे हाल संपलेले नाहीत. तालुक्यातील २३ गावांतील वीजपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे वीज नसल्याने पाणीपुरवठय़ावरही परिणाम होत आहे. ज्या गावाचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे तेथील वीजही सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे.

कर्मचाऱ्यांचे प्रयत्न

या वादळात महावितरणची ३२ उपकेंद्रे बंद पडली होती. ६ हजार ७७३ रोहित्रांमध्ये बिघाड झाला होता. उच्चदाबाचे ५ हजार ५०७ खांब तर, लघुदाबाचे ११ हजार ०८९ खांब जमीनदोस्त झाले होते. त्यामुळे वीजपुरवठा पूर्ववत करण्यात मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या होत्या. या कामासाठी प्रचंड मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यामुळे राज्यातील विविध भागांतून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पथकांना रायगड जिल्ह्य़ात पाचारण करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही श्रीवर्धन तालुक्यातील ८१ गावांपैकी २३ गावांतील खंडित वीजपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. सध्या ११ एजन्सीचे १४० कर्मचारी या तालुक्यात कार्यरत आहेत. मात्र तरीही या गावांचा वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान सात ते आठ तासांचा कालावधी लागेल असा अंदाज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. चार गावे डोंगराळ भागात असल्याने तेथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी आहेत.

तांत्रिक अडचणी आणि करोनाचा प्रादुर्भाव यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र पुढील सात दिवसांत उर्वरित कामे पूर्ण केली जातील, नुकसान जास्त असल्याने नव्याने सर्व यंत्रणा उभी करण्यावर आम्हाला भर द्यावा लागत आहे.

– दीपक पाटील, अधीक्षक अभियंता महावितरण

वादळामुळे श्रीवर्धनमधील वीज यंत्रणा जवळपास पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. खाडीपट्टा आणि डोंगराळ भागात ही यंत्रणा नव्याने उभी करणे आव्हानात्मक होते. त्यामुळे कामाला उशीर झाला. पण आता या कामाला गती मिळाली आहे. लवकरच ते पूर्ण होईल. या परिसरात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे प्रयत्न केले जातील.

– अनिकेत तटकरे, आमदार

दीड महिना झाला तरीही ८१ पैकी २३ गावे अजूनही अंधारात आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. आठवडय़ाभरात सर्व गावांचा वीजपुरवठा सुरू झाला नाही तर महावितरणविरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येईल.

– सुकुमार तोंडलेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख