परीक्षा परिषदेने दखल न घेतल्याने विद्यार्थी संतापले

शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) मराठीच्या प्रश्नपत्रिकेत शुध्दलेखनाच्या विक्रमी २३० चुका झाल्याची बाब येथील विद्यार्थ्यांनी हेल्पलाईन तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही, आता परीक्षा झालेली आहे, आम्ही काहीच करू शकत नाही, असे बेजबाबदारपणाचे उत्तर हेल्पलाईनकडून मिळाल्याने विद्यार्थी चांगलेच संतापले आहेत. योग्य पध्दतीने परीक्षा घेणे होत नाही तर मग ती घेताच कशाला? असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी केला आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शनिवार २२ जुलैला राज्यातील १ हजार ३६२ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या ‘टीईटी’च्या मराठीच्या १५० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये शुध्दलेखनाच्या विक्रमी २३० चुका आढळून आल्या. यामध्ये बालकवींचे नाव त्र्यंबक बापूजी ठोबरे असे छापले आहे. ‘जेव्हा मी जात चोरली’ या कथासंग्रहाचे नाव जेव्हा मीजात चोरली होती, असे छापले आहे, कैऱ्या ऐवजी कैन्या, त्याला ऐवजी ल्याला, पुढील ऐवजी पुदील, उताऱ्या ऐवजी उताण्या, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे नाव तखर्डकर असे छापले आहे. प्रश्नपत्रिका एकसोबतच प्रश्नपत्रिका दोनमध्येही चुका आहेत. विशेष म्हणजे परीक्षा होताच येथील काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र प्रमुखांना या चुका निदर्शनास आणून दिल्या. मात्र, त्यांनी हात वर केले. काही विद्यार्थ्यांना अक्षरश: पेपरची काही पाने कोरी आली होती. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांकडून त्यांना प्रश्न घ्यावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेला.

दरम्यान, येथील परीक्षार्थी सचिन गुरूनुले, सचिन वरभे, सुयोग ठाकरे, गणेश शेंडे, सचिन शेंडे यांनी या चुका हेल्पलाईनच्या निदर्शनास आणून दिला. त्यांना दूरध्वनीवर ही माहिती सुध्दा दिली. मात्र, हेल्पलाईनने आता परीक्षा झालेली आहे, तेव्हा आम्ही काहीच करू शकत नाही असे बेजबाबदारपणाचे उत्तर दिले. त्यानंतर या परीक्षार्थीनी पाठपुरावा केला, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेलाही मेल तथा पत्र पाठवून शुध्दलेखनाच्या विक्रमी चुकांची माहिती देण्यात आली. परंतु राज्य परीक्षा परिषदेनेही याची दखल घेतली नाही. दीडशे प्रश्नांच्या पेपरमध्ये २३० चुका असतील तर विद्यार्थी काय पेपर सोडविणार आहेत, असा प्रश्नही या सर्व विद्यार्थ्यांनी या तक्रारीतून विचारलेला आहे. राज्य सरकारचा परीक्षा विभाग शिक्षकांची परीक्षाच योग्य पध्दतीने घेऊ शकत नसेल तर मग परीक्षेचे सोंग उभे केलेच कशाला, असाही प्रश्न या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

‘टीईटी’च्या परीक्षेतील हा चुकांचा पाऊस बघता स्थानिक विद्यार्थ्यांनी सर्व केंद्रातील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून आता थेट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडेच तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षकांची पात्रता परीक्षा तर शिक्षण विभाग अशा पध्दतीने घेत असेल तर हा फार्स बंद करा, असेही तावडे यांना पाठविलेल्या पत्रातून विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. तसेच ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी केली आहे.