देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अधिकच वेगाने वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता करोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील करोनाचा झपाट्याने संसर्ग होताना दिसत आहे. राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १० हजाराच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे.

मागील चोवीस तासांत राज्यभरात २३२ नवे करोनाबाधित पोलीस आढळले असून, एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, याचबरोबर राज्यातील करोनबाधित पोलिसांची संख्या ९ हजार ४४९ वर पोहचली आहे. यामध्ये ९७१ अधिकारी व ८ हजार ४७८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सद्यस्थितीस २१९ अधिकारी व १७१३ कर्मचारी मिळून १ हजार ९३२ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर, ७४३ अधिकारी व ६६७१ कर्मचारी मिळून एकूण ७ हजार ४१४ पोलीस आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. तसेच, आतापर्यंत १०३ पोलिसांचा मृत्यू झालेला असून, यामध्ये ९ अधिकारी व ९४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

करोना संकटावर मात करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता त्यांना देखील दिवसेंदिवस अधिकच करोनाचा संसर्ग होत असल्याचे आढळून येत आहे.

संपूर्ण देशभर करोना रुग्णांची संख्या चिंताजनक वेगाने वाढत असून मागील चोवीस तासांत ५५ हजार ७८ लोकांना संसर्ग झाला, तर ७७९ रुग्ण दगावले. तर महाराष्ट्रात १०,३२० रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील  करोनाबाधितांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७० वर पोहोचली आहे. चोवीस तासांमध्ये ३७ हजार २२३ रुग्ण करोनामुक्त झाले असून ५ लाख ४५ हजार ३१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उच्चस्तरीय मंत्रिगटाच्या १९व्या बैठकीत दिली. केंद्र सरकारने पुणे, ठाणे, बेंगळूरु, हैदराबाद अशा करोनाग्रस्त शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे.