करोनाबाधित महिलेवर मांत्रिकाकडून उपचार, महिलेचा मृत्यू

विदर्भात करोनाग्रस्तांच्या मृत्यूचे तांडव सुरू असून गेल्या २४ तासांत येथील अकरा जिल्ह्य़ांत तब्बल २३६ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय दिवसभऱ्यात १६ हजार ४१ नवीन रुग्णांची भर पडली. नागपुरात दिवसभरात ४०, ग्रामीण ३३, जिल्ह्य़ाबाहेरील ६, असे एकूण   ७९ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर येथे ६ हजार ९५६ रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात २३ रुग्णांचा मृत्यू तर १ हजार २४० रुग्ण आढळले. अमरावतीत ११ मृत्यू तर ७९९ नवीन रुग्ण,  चंद्रपूरला २३ मृत्यू तर १ हजार ५९३ रुग्ण, गडचिरोलीत १५ मृत्यू तर ४६६ रुग्ण, गोंदियात २२ मृत्यू तर ८८५ रुग्ण,  यवतमाळला २६ मृत्यू तर १ हजार ४८ रुग्ण आढळले. वाशीमला ८ मृत्यू तर ६२० रुग्ण आढळले. अकोल्यात १० मृत्यू तर ६५६ रुग्ण आढळले. बुलढाण्यात ६ मृत्यू तर १ हजार २८५ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात १३ मृत्यू तर ४९३ रुग्ण आढळले. विदर्भात झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये नागपूर जिल्ह्य़ातील ३३.४७ टक्के मृत्यूंचा समावेश आहे.

अमरावती : करोनाबाधित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी मांत्रिका (भूमका)कडे नेल्याने या महिलेचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार मेळघाटात उघड झाला आहे. अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.

मेळघाटातील या ४५ वर्षीय महिलेला सर्दी, खोकला अशा प्रकारची प्राथमिक लक्षणे असल्याने सेमाडोह येथील आरोग्य केंद्रात तिची अँटीजन चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेच्या कु टुंबीयांना माहिती दिली तसेच महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या.

मात्र महिलेच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले तसेच महिलेला साधा सर्दी, खोकला असून तिला करोना झाला नसल्याचे सांगितले व डॉक्टरांशीच वाद घातला, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली.

नातेवाईकांनी महिलेला उपचारांसाठी मांत्रिकाकडे नेल्यानंतर तिच्यावर घरगुती उपचार करण्यात आले. त्यादरम्यान महिलेचा मृत्यू झाला, याबाबतची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांना मिळताच एक पथक महिलेच्या घरी पाठविण्यात आले. मात्र तिच्या नातेवाईकांकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही, असे  डॉ. रणमले यांनी सांगितले.

बऱ्याच प्रयत्नानंतर सदर महिलेवर गुरुवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. एकीकडे जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा नागरिकांना करोना विषयी वारंवार माहिती देत असून काळजी घेण्याचे आवाहन करीत आहे. कुठलीही लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. मात्र मेळघाट सारख्या भागात अंधश्रद्धा अजूनही पाळली जात असल्याचे या दुर्दैवी घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी देखील मेळघाटामध्ये नवजात बालकांना आजारातून बरे करण्यासाठी (भुमका) मांत्रिकाकडून डंभा दिल्या असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

आरोग्यविषयक प्रबोधन आवश्यक

मेळघाटमध्ये घडलेली ही घटना अंधश्रद्धेचा प्रकार असून हे अत्यंत दुर्दैवी आहे. आरोग्य यंत्रणेकडून मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य विषयक प्रबोधनाची आवश्यकता आहे. त्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रशासनासोबत आहे.

हरीश केदार, जिल्हा सचिव, अंनिस.

वर्धेत रेमडेसिविरचे उत्पादन सुरू होईल -गडकरी

नागपूर आणि विदर्भात असलेली रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चार दिवस सातत्याने पाठपुरावा करून वध्र्याच्या  ‘जेनेटेक लाईफ सायन्सेस’ला ३० हजार वायल प्रतिदिन रेमडेसिविर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळवून दिली आहे. रेमडेसिविर तयार करणाऱ्या गिलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली होती. त्यातील एक कंपनी ‘लोन लायलंस’द्वारा जेनेटिक लाईफ सायन्स रेमडेसिविर इंजेक्शन तयार करेल. साधारण एका आठवडय़ात वध्र्यात रेमडेसिविरचे उत्पादन सुरू होईल आणि पंधरा दिवसांत ३० हजार वायल प्रतिदिन इंजेक्शन विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांत उपलब्ध होतील. यासाठी आवश्यक त्या सगळ्या परवानगी गडकरी यांनी मिळवून दिल्या आहेत.