देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अधिकच वाढत आहे. करोना संकटावर मात करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता सर्वसामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धे असलेल्या पोलिसांना देखील करोनाचा अधिकच संसर्ग होताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात २३६ पोलीस करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, तर एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरनाबाधित पोलिसा कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आता ८ हजार ९५८ वर पोहचली असून, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या ९८ झाली आहे. राज्यातील एकूण ८ हजार ९५८ करोनाबाधित पोलिसांपैकी आतापर्यंत ६ हजार ९६२ पोलिसांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर, सध्या १ हजार ८९८ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

देशातील करोनाबाधितांच्या संख्येने आता तब्बल १५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर मागील २४ तासांत देशात ४८ हजार ५१२ नवे करोनाबाधित आढळले तर ७६८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १५ लाख ३१ हजार ६९९ वर पोहचली आहे.

सद्यस्थितीस देशात करोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ९ हजार ४४७ आहे. तर, ९ लाख ८८ हजार ३० जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेला आहे. देशात आतापर्यंत करोनामुळे ३४ हजार १९३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.