राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. सामान्य नागरिरकांबरोबर करोना योद्धे समजले जाणारे पोलीस देखील करोनाच्या विळख्यात सापडत असल्याचे दिसून येत आहे. मागील ७२ तासांत २७३ पोलीस करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायका माहिती समोर आली आहे.

राज्यात सद्यस्थितीस एकूण १ हजार ४० पोलिसांवार करोनाचा उपचार सुरू असून, आतापर्यंत करोनामुळे ६४ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्चपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीतही अत्यावश्यक सेवेतील कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांनी करोना लढाईत अक्षरश: आपले प्राण पणाला लावले आहेत. केवळ डॉक्टर, परिचारिका किंवा आरोग्य क्षेत्रातील कर्मचारीच नव्हे तर पोलीस, रेल्वे, बेस्ट, पोस्ट, एसटी, बँक या क्षेत्रांतील २०० पेक्षा अधिक करोनायोद्धय़ांनी आतापर्यंत प्राण गमावले आहेत.

आणखी वाचा- मुंबईपेक्षा आता ठाण्यात करोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण जास्त!

करोनाला तोंड देण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. नागरिकांनी घरात सुरक्षित रहावे म्हणून हे सर्व करोना योद्धे जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. मात्र, आता या करोना योद्ध्यांना करोनाने विळखा दिल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा- अरे बापरे… देशात करोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

देशात गेल्या २४ तासांत २२, ७७१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. करोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांची झपाट्याने वाढत असलेली संख्या पाहून नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६,४८,३१५ इतकी झाली आहे. यापैकी दोन लाख ३५ हजार ४३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर तीन लाख ९४ हजार २२७ जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात ४४२ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत देशभरात १८, ६५५ लोकांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.