अनुकंपा तत्वावरील नोकरभरती प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर व बँकेचे सीईओ दुबे यांना अटक झाल्यानंतर आज(शुक्रवार) संचालक मंडळानी या २४ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई केलीे आहे.

या  कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस असल्याचा कारणावरून ही कारवाई करण्यात आली. मात्र, दुसरीकडे वैद्यकीय मंडळासमोर येत्या २५ ऑगस्टला या कर्मचाऱ्यांची फेरवैद्यकीय तपासणी होणार आहे. त्या अगोदरच कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान या निर्णयाच्या विरोधात हे कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या तयारी आहेत.

बँकेच्या २४ कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियमबाह्य पध्दतीने अनुकंप तत्वावर नोकरीत सामावून घेतल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सिध्दार्थ नामदेव दुबे हे फरार झाले होते. मात्र त्यांनी जुलै महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेत शरणागती पत्करल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील २४ कर्मचाऱ्यांना शारीरिकदृष्ट्या काम करण्यास असमर्थ असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र जोडून २४ पाल्यांना अनुकंप तत्वावर बँकेच्या सेवेत सामावून घेतले होते. या प्रकरणाची तक्रार बँकेचे संचालक संदिप गड्डमवार, संतोष रावत व माजी अध्यक्ष शेखर धोटे यांनी केली होती.