अकोला : ‘२४ एचआरसीटी स्कोर’ असूनही जिल्हा शासकीय कोविड रुग्णालयामधील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे वाशीम जिल्हय़ाच्या पारवा येथील रामेश्वर राधाकिसन चव्हाण हा युवक करोनामुक्त झाला. एक महिन्यानंतर त्याला १९ जूनला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

मानोरा तालुक्यातील पारवा येथील रामेश्वर चव्हाण या ३३ वर्षीय युवकाला करोना संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने विविध तपासण्या केल्या. यामध्ये त्याला करोना संसर्ग झाल्याचे निदान झाले, तसेच त्याचा ‘एचआरसीटी स्कोर’ २४ पर्यंत आल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी प्रयत्न केले. मात्र, वाशीमसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रयत्न करूनही खाटा उपलब्ध न झाल्याने १५ मे रोजी त्याला वाशीम जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल केले. प्राणवायूची पातळी सुमारे ५०च्या आसपास होती. वैद्यकीय अधिकारी डॉ. राम हजारे यांच्या चमूने रामेश्वरवर उपचार केले. डॉक्टरांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रामेश्वरचा करोना चाचणी अहवाल ३० मे रोजी नकारात्मक आला. तो करोनामुक्त झाला, मात्र रुग्णालयात दाखल होण्यास विलंब झाल्याने फुफ्फुसामध्ये मोठय़ा प्रमाणात हानी झाली होती. त्यामुळे करोनामुक्त होऊनही त्याच्या रक्तातील प्राणवायूची पातळी वाढण्याची गती कमी होती. डॉक्टरांनी कृत्रिम यंत्राच्या सहाय्याने उपचार केल्याने त्याच्या रक्तातील प्राणवायूची पातळी हळूहळू ९२ पर्यंत वाढण्यास मदत झाली. त्यानंतर त्याला १९ जूनला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

डॉ. राम हजारे यांनी सांगितले की, रामेश्वर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्यांची तब्येत खूपच गंभीर झाली होती. त्यामुळे आम्ही तातडीने उपचार सुरू केले, त्यांना सतत निगराणीखाली ठेवून त्यांच्या तब्येतील बदल लक्षात घेऊन उपचारात बदल केले. अखेर आमच्या प्रयत्नांना यश येऊन रामेश्वर यांनी करोनावर मात केली.