जिल्ह्यातील करोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करूनही त्याचा संसर्ग जळगावसह ग्रामीण भागात सुरूच असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत नव्याने २४ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णांची एकूण संख्या ५९५ झाली आहे.

रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव, फैजपूर, धरणगाव, चाळीसगाव, चोपडा येथील १९६ करोना संशयितांचे तपासणी अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यापैकी १७२ अहवाल नकारात्मक, तर २४ अहवाल सकारात्मक आले आहेत.

सकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्तींमध्ये चोपडा, चाळीसगाव, फैजपूर, धरणगाव, शिरपूर, बोरकुल येथील प्रत्येकी एक, जळगावातील आठ, भुसावळ चार, सावदा दोन, तर पावरा येथील चार रूग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

दरम्यान, करोनामुक्तीचे स्वप्न पाहणाऱ्या पाचोरा तालुक्यात नव्याने तीन रूग्ण आढळून आल्याने प्रशासनाचा हिरमोड झाला. शेजारच्या भडगावमध्येही चार जणांचे अहवाल सकारात्मक आल्याने तेथील रूग्णसंख्या ६७ वर गेली आहे. पाचोरा तालुक्यात २६ मेपर्यंत २३ रूग्ण होते. त्यापैकी तिघांच्या मृत्यूनंतर त्यांचा अहवाल सकारात्मक आला होता. तर १९ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.

सध्या पाचोऱ्याची रुग्ण संख्या २६ असून २० जणांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले. तर तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण उपचार घेत आहेत. पाचोऱ्यात बुधवारपर्यंत केवळ एका रुग्णावर उपचार सुरू होते.

दुसरीकडे, शेजारच्या भडगावातील रूग्णसंख्याही ६७ वर पोहचली आहे. दोन रुग्ण इतरत्र उपचार घेत असले तरी त्यांचा मूळ पत्ता भडगाव आहे. तीन बाधितांचा यापूर्वीच मृत्यू झाला असून ३६ जण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. एकूण २८ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. भडगावच्या शनी चौक भागातील एका सात महिन्याच्या बालकाने करोनावर मात केल्याने सर्वानी आनंद व्यक्त केला.