अभूतपूर्व आलेल्या महापुरामुळे उद्ध्वस्त झालेली नदीकाठची चोवीस गावे दत्तक घेण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हयाचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पूरग्रस्त भागाची पाहणी करून आणि विविध ठिकाणी सुरू असलेल्या स्वच्छतेच्या मोहिमेची माहिती घेतल्यानंतर मंत्री देशमुख यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आ. सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

या वेळी मंत्री देशमुख म्हणाले,की पूरग्रस्त भागातील लोकांचे मनोधर्य अबाधित ठेवण्यासाठी मानसिक आधार देण्याची गरज असून आपत्तीत ते एकाकी नसून शासन आणि सर्व समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे. बाधित झालेली २४ गावे दत्तक घेण्यात येणार असून पंढरपूर येथील मंदिर समितीने पाच, सांगली बाजार समितीने दोन, मुंबई बाजार समितीने एक अशा पद्धतीने ही गावे दत्तक घेतली आहेत. अन्य काही कंपन्यांची मदत घेऊन इतर गावेही दत्तक घेण्यात येणार आहेत.

ते म्हणाले,की पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आवश्यक असेल त्याप्रमाणे मदतीचे नियोजन करण्यात येत आहे. भाडेकरूंनाही मदत देण्यात येईल. व्यापाऱ्यांचेही विविध प्रश्न आहेत. ते प्रश्नही सोडवण्यात येतील. कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नाही. शहरासह जिल्ह्यत तातडीने उपाय योजना करण्यात येत आहेत.

दरम्यान, काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यां सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि अभिनेते नाना पाटेकर यांनी गुरुवारी पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सांगली येथे माध्यमांशी बोलताना मातोंडकर म्हणाल्या, की सरकार आपल्या परीने मदत करीत आहे. पण सर्व काही उद्ध्वस्त झालेल्यांना मानसिक आधार देण्याची आज गरज आहे. ही गरज एक माणूस म्हणून आपण सर्वानी करण्याची आवश्यकता आहे.