ग्रामीण भागात शिक्षण, योग्य मार्गदर्शन अशा विविध समस्या असताना प्रतिकूल परिस्थितीस तोंड देत चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील सचिन न्याहारकर यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. जिद्द, चिकाटी आणि श्रम करण्याची तयारी असल्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवू शकतो हे न्याहारकर यांनी दाखवून दिले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत न्यायाधीश पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत न्याहारकर यानी इतर मागासवर्गीय गटातून दुसरा तर खुल्या गटात दहावा क्रमांक मिळविला. न्याहारकर यांनी वाहेगाव येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर लासलगाव महाविद्यालयात बारावी पूर्ण केली. पुढील शिक्षणासाठी पुणे येथील आयएलएस विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. अभ्यासात सातत्य व प्रचंड मेहनत घेऊन २०१२ मध्ये प्रथम श्रेणी मिळवत पदवी प्राप्र्त केली. घरी जिरायती शेती असल्याने तसेच वडील हमाली करून उदरनिर्वाह करत असल्याने घरची परिस्थिती बेताची होती. परंतु वडिलांनी कधीही अडचण येऊ दिली नाही. दरम्यानच्या काळात न्याहारकर यांच्या मोठय़ा बंधुस लष्करात संधी मिळाल्याने कौटुंबिक परिस्थितीत सुधारणा झाली. त्यामुळे शिक्षण घेताना मोठा आधार मिळाला. न्यायाधीश होण्याचे स्वप्न बाळगून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरूवात केली. त्यानंतर दुसऱ्याच प्रयत्नात न्यायाधीश पदाच्या परीक्षेत येश मिळविले.
वयाच्या २४ व्या वर्षी न्यायााधीश होणारे न्याहारकर हे तालुक्यातील पहिलेच विद्यार्थी होय.
शालेय शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवून जास्तीत जास्त वेळ देत अभ्यास केला. त्यासाठी वडील व भावाची वेळोवेळी योग्य मदत मिळाल्याने कमीतकमी कालावधीत यश मिळविता आले, असे न्याहारकर यांनी नमूद केले. सचिन लहानपणापासूनच हुशार होता. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला. अभ्यासात नेहमी सातत्य ठेवले. त्यामुळे एवढय़ा कमी वेळात तो न्यायाधीश पदापर्यंत पोहचू शकला, अशी प्रतिक्रिया सचिन यांचे वडील उत्तमराव न्याहारकर यांनी दिली. न्याहारकर यांनी मिळविलेल्या यशामुळे ग्रामीण भागातील इतर युवकांनाही प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.