‘प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्व निकष पूर्ण करूनही त्यापासून वंचित ठेवण्यात आले तसेच मुद्रा योजनेअंतर्गही कर्ज मिळत नसल्याने हताश झालोय’, असे चिठ्ठीत नमूद करुन बुलढाण्यात एका तरुणाने आत्महत्या केली. संतप्त ग्रामस्थांनी तरुणाचा मृतदेह संग्रामपूर तहसील कार्यालयात ठेवून सरकारी यंत्रणांचा निषेध केला.

संग्रामपूर तालुक्यातील पळशी झांशी येथे सागर वाघ (वय २४) या तरुणाने सोमवारी शेतात गळफास घेत आत्महत्या केली. सागरच्या खिशात पोलिसांना चार पानी चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीत सागरने सरकारी यंत्रणांमुळे हतबल झाल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. सागरच्या पश्चात आई-वडील, दोन लहान भाऊ आहेत.

काय म्हटले आहे चिठ्ठीत?
सागर चिठ्ठीत लिहितो, ‘प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्व निकष पूर्ण करूनही मला त्यापासून वंचित ठेवण्यात आले. तसेच, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मुद्रा योजनेतून कर्जाची मागणी केली असता तेही बँकेने दिले नाही. सातत्याने दोन वर्षांपासून संग्रामपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकाने नुसते खेटे घालायला लावले. त्यामुळे माझी ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्या आहे. यात सुधार होणे गरजेचे आहे. परिवाराला कमीत कमी पाच लाख रुपये प्रत्यक्ष सरकारी मदत मिळत नाही, तोपर्यंत ग्रामस्थांनी माझा मृतदेह जागेवरून उचलू देऊ नये. शेतमजुरांची अवस्था बिकट असल्याने आता त्यांनी एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे. परंतु, यामध्ये शासकीय तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान होता कामा नये, असेही चिठ्ठीत सागरने नमूद केले. तसेच सागरने शरीराचे अवयव गरजू व्यक्तींसाठी दान करण्याची विनंतीही चिठ्ठीत केली.

गुन्हे दाखल करण्याची मागणी
सागरच्या आत्महत्येनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी शासकीय यंत्रणाच सागरच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप करत त्याचा मृतदेह संग्रामपूर तहसील कार्यालयात ठेवला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. बँक व्यवस्थापकावरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही या प्रसंगी करण्यात आली. या प्रकरणामुळे बँक ऑफ महाराष्ट्रची शाखाही बंद ठेवण्यात आली होती.