परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येऊनही कॉपीबहाद्दरांचे धाडस कायम असून अमरावती विभागात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या २४६ परीक्षार्थीना आतापर्यंत पकडण्यात आले आहे. मराठी आणि हिंदी यासारख्या विषयांमध्येही विद्यार्थी कॉपी करताना सापडले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परीक्षेला गेल्या १ मार्चपासून सुरुवात झाली आहे. बारावीची परीक्षा २० मार्च, तर दहावीची परीक्षा २४ मार्चपर्यंत चालणार आहे. विभागात एकूण ४७७ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीम या पाच जिल्ह्यांतून इयत्ता बारावीचे १ लाख ५३ हजार ५०४ तर दहावीचे १ लाख ८३ हजार ६९७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक १९४ परीक्षा केंद्रे आहेत.

प्रत्येक जिल्ह्यंसाठी ६ भरारी पथके सज्ज आहेत. त्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील पथकासह महिला पथकाचाही समावेश आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात दक्षता समिती देखील कार्यरत आहे. प्रश्नपत्रिकांचे नियोजन उत्तम व्हावे, यासाठी विभागात पर्यवेक्षक (कस्टोडियन) आहेत.

बारावीच्या परीक्षेत एकूण १६३ विद्यार्थी कॉपी करताना निदर्शनास आले आहेत. सर्वाधिक कॉपीबहाद्दर अमरावती जिल्ह्यात पकडले गेले असून एकूण ९४ परीक्षार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यातून ३२, अकोला जिल्ह्यातून १७, वाशीम जिल्ह्यातून १४, तर यवतमाळ जिल्ह्यातून ६ परीक्षार्थी पकडले गेले आहेत.

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी तपासणीच्या वेळी एकूण ८३ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. त्यात अमरावती जिल्ह्यातील ५२, अकोला २४, वाशीम ४ आणि यवतमाळ जिल्ह्यातील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी आहे. केंद्रावरील सर्व पर्यवेक्षकांनाही मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यांना आपले मोबाईल केंद्र संचालकांकडे जमा करावे लागतात. परीक्षार्थ्यांना सकाळी १०.३० वाजता परीक्षा केंद्रात हजार राहण्यास सांगण्यात येत आहे. परीक्षा हॉलमध्ये केवळ २५ विद्यार्थी राहतील याची दक्षता घेण्यात येत आहे. याच दालनात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका उघडल्या जातात. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात येत आहे. अनेक कडक उपाययोजना करूनही कॉपीची प्रकरणे उघडकीस येत आहेत.

विभागातील काही परीक्षा केंद्रे संवेदनशील मानली जातात. ही केंद्रे कॉपीसाठी ओळखली जातात. त्याकडे विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे विभागीय मंडळातील सूत्रांनी सांगितले.

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा दक्षता समितीने नेमलेले भरारी पथक प्रत्येक परीक्षा केंद्रावर जाऊन तपासणी करीत आहे. परीक्षा केंद्रांवरील नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडण्यास कसूर केल्यास त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. कॉपीमुक्त अभियान राबवले जात असतानाही अनेक ठिकाणी मात्र विद्यार्थी कॉपी करण्याचे धाडस दाखवत आहेत.