प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

पंढरपूर : दिल्लीतील दंगलीच्या  काळात २५ लाख सैनिक पोषाखांची विक्री झाल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख  प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच एक दंगल झाली म्हणजे सगळे संपले असे नाही पुन्हा दंगल झाली तर आश्चर्य वाटू नये असे त्यांनी म्हटले आहे.

आंबेडकर एका कार्यक्रमानिमित्त पंढरपूर येथे शनिवारी आले होते. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपा आणि राज्य सरकारवर टीका केली. ते  म्हणाले, जे लोक धर्माच्या नावाने राजकारण करत सत्ता  मिळवतात त्यांना देशाची सत्ता नीट पणे चालवता येत नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तेच झाले आज मोदी असतानाही तेच होत आहे. दिल्ली दंगलीत अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांंना मारहाण करताना सैनिकी व  पोलीस वेशातील लोक दिसले होते.२५ लाख सैनिकी गणवेश कोणी खरेदी केले हा प्रश्नच आहे.

राज्य अर्थसंकल्पावर आंबेडकर यांनी  टीका केली. सरकारची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.अर्थसंकल्पात आठ हजार कोटीची तूट असल्याचे दाखवले. दरम्यान, सोलापूरचे  भाजप खासदार डॉ. जयसिध्देश्ववर शिवाचार्य महास्वामी यांचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला असला तरी न्यायालयीन प्रक्रियेमुळे खासदार पाच वर्ष काढतील असा टोला आंबेडकर यांनी लगावला आहे.