कराडनजीकच्या जयवंत शुगर साखर कारखान्याच्या सुमारे ६ लाख ७३ हजार १५० रुपये किमतीच्या साखरेचा अपहार केल्याप्रकरणी तीन जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात पुणे येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत शुगरची ६ लाख ७३ हजार १५० रुपये किमतीची सुमारे २५० क्विंटल साखर पुणे येथील चौधरी ट्रान्सपोर्टमधून मालट्रकने (क्रमांक आर जे २१ जीए ५१२५) बिकानेर येथील साखर व्यापाऱ्याकडे १५ मार्चपर्यंत पोहोचणे अपेक्षित होते.
मात्र, १९ मार्चअखेर मालट्रक पोहोचला नाही. या प्रकरणी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकांनी वारंवार ट्रकचालकाशी मोबाइलवर संपर्क साधला. मात्र ट्रक नादुरुस्त आहे. पोहोचण्यास वेळ लागेल अशी वेगवेगळी कारणे ट्रकचालकाकडून दिली जात होती. अखेर चौधरी ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक अशोक सीताराम राजपुरोहित यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात ट्रकमालक ओमप्रकाश रामजीवन माळी (रा. भसवासी, ता. नागोरी, राजस्थान), दुसरा चालक हनुमानसिंग (पूर्ण नाव माहीत नाही), ट्रक क्लीनर दिलीप ओमप्रकाश माळी या तिघांनी साखर पोत्यांचा अपहार केला असल्याची फिर्याद दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2014 3:36 am