मालेगावात आत्तापर्यंत २५० करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मालेगावातली परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  तर राज्यातील रुग्णांची संख्या २५ हजार ९२२ आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मालेगाव येथे दौरा केला आणि तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

बुधवारी आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अचानक मालेगावात आले. कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ते करोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेत असताना सायंकाळी याच ठिकाणी हा अहवाल प्राप्त झाला. आयुक्तांसह तीन महिन्यांपूर्वीच येथे रुजू झालेल्या २९ वर्षीय एका सहाय्यक आयुक्तांनाही बाधा झाल्याचे यावेळी निष्पन्न झाले आहे. यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली.