News Flash

बेपत्ता १५७ मुलांचे गूढ कायम

वसई-विरार आणि मीरा-भाईंदरमध्ये पाच वर्षांत अडीच हजार अल्पवयीन मुले गायब होण्याचे प्रकार

वसई-विरार आणि मीरा-भाईंदरमध्ये पाच वर्षांत अडीच हजार अल्पवयीन मुले गायब होण्याचे प्रकार

सुहास बिऱ्हाडे, लोकसत्ता

वसई : वसई-विरार आणि मीरा भाईंदर शहरातून मागील पाच वर्षांत बेपत्ता झालेल्या अडीच हजारांहून अधिक अल्पवयीन मुलांपैकी १५७ मुला-मुलींचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यांचे पुढे काय झाले याचे गूढ अद्याप कायम आहे. या बेपत्ता मुलांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष मोहीम सुरू केली जाणार आहे.

अल्पवयीन मुले विविध कारणांमुळे घरातून निघून जातात तर काहींचे अपहरण केले जाते. अल्पवयीन मुले बेपत्ता झाली तर अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. वसई-विरार तसेच मीरा-भाईंदर शहरातून दररोज दिवसाला एक मुलगा किंवा मुलगी बेपत्ता होत असते. यातील बहुतांश मुली या प्रेमप्रकरणातून घरातून निघून जातात किंवा त्यांना फूस लावून पळवून नेले जाते. मागील पाच वर्षांत म्हणजे २०१६ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत विरार आणि मीरा-भाईंदर शहरातून दोन हजार ५४८ मुले-मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यात ८४६ मुले आणि एक हजार ७०२ मुलींचा समावेश होता. त्यापैकी दोन हजार ३९१ मुलांचा शोध लागला आहे. मात्र अद्यापही १५७ मुलामुलींचा शोध लागलेला नाही.  बेपत्ता असलेल्यांमध्ये ३० मुले आणि १२७ मुलींचा समावेश आहे.  पालकांमध्ये आपल्या मुलांचे काय झाले याची चिंता भेडसावत असून ते सतत पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहेत.

नव्याने स्थापन झालेल्या मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची विभागणी ३ परिमंडळांत करण्यात आली आहे. सर्वाधिक बेपत्ता मुले विरारच्या परिमंडळ ३ मधून बेपत्ता झाली आहेत. त्यात विरार, तुळींज आणि वालीव पोलीस ठाण्याचा समावेश होतो. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एक हजार ५३५१ मुलेमुली बेपत्ता झाली आहेत त्यात ५४० मुले  आणि एक हजार ७२ मुलींचा समावेश आहे. वसई परिमंडळ २ मध्ये वसई, माणिकपूर आणि नालासोपारा पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. या परिमंडळातून ३१६ मुलेमुली बेपत्ता झाली आहेत. मीरा-भाईंदर शहरातून ५९० मुले बेपत्ता झाली आहेत.  पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी  यासाठी पुन्हा ‘ऑपरेशन मुस्कान’ राबविले जाणार आहेत.

२०२० मधील ५७ मुलांचा थांगपत्ता नाही

चालू वर्षांत १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या कालावधीत वसई-विरार आणि मीरा-भाईंदर शहरातून एकूण ३८३ मुले बेपत्ता झाली. त्यात १०२ मुले आणि २८१ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ३२७ मुलांचा शोध लागला तर अद्याप ५६ मुले बेपत्ता आहेत. त्यात ९ मुले आणि ४७ मुलींचा समावेश आहे.

बेपत्ता झालेली अल्पवयीन मुले

२०१६ ते २०२० (३० नोव्हेबपर्यंत)

* एकूण बेपत्ता मुले – २,५४८   (मुले – ८४६, मुली १,७०२)

*  सापडलेली मुले – १ ,७०२ (मुले ८१६ मुली १ हजार ५७५)

*  अद्याप बेपत्ता १५७

(मुले ३०, मुली १२७)

बेपत्ता मुलामुलींना शोधण्यास आम्ही प्राधान्य दिले असून त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात खास पथक स्थापन करण्यात आले आहे. या मुलांना शोधून सुखरूप त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येईल.

– सदानंद दाते, पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर, वसई-विरार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 3:16 am

Web Title: 2500 minors missing in five years in vasai virar and mira bhayander zws 70
Next Stories
1 ५७ कोटींचा विकास निधी खर्चाविना पडून
2 विरारच्या मळ्यामंदी गटाराचं पाणी जातं..
3 रायगडमधील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर
Just Now!
X