पाच वर्षे चार महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक २५०१ बालमृत्यूच्या घटना

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : पालघर जिल्ह्यात सर्वाधिक बालमृत्यू हे मुदतपूर्व प्रसूती (कमी दिवसात जन्मलेली बालके/प्रिमॅच्युर) झाल्यामुळे दगावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जिल्ह्यत गेल्या पाच वर्षे चार महिन्यात ० ते ६ वर्षांची ३३८ बालके मुदतपूर्व प्रसूतीमुळे दगावली आहेत. मुदतपूर्व प्रसूती होण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते थांबवण्याचे  मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. इतर कारणांमुळे बालमृत्यू होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.

जिल्ह्यत सर्वाधिक बालमृत्यू ग्रामीण भागात झालेले आहेत. जव्हार व डहाणू तालुक्यात सर्वाधिक बालमृत्यूचे प्रमाण आहे. कुपोषण, कमी दिवसात जन्मलेले बाळ, कमी वजनाचे बाळ, इतर आजार, अपघात, श्वासोच्छ्वास कोंडणे अशा विविध कारणांनी ० ते ६ वर्षांच्या बालकांचा बालमृत्यू होत असल्याचे तज्ज्ञमार्फत सांगण्यात येते तर रक्तक्षय, मुदत पूर्व प्रसूती, शारीरिक कमजोरी, हृदयविकार अशा कारणांमुळे माता मृत्यू होत आहेत. यातील बहुतांश बाल मृत्यू जव्हार व डहाणू तालुक्यात झालेले आहेत.बालमृत्यू जून ते सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक होत आहेत.

पालघर जिल्ह्यत गेल्या सहा वर्षांत मुदतपूर्व प्रसूतीमुळे बालकांची मृत्यू झाल्याचे संख्या जास्त असली तरी कमी वजनाचे बाळ जन्मल्यामुळेही मृत्यूचे प्रमाण बऱ्यापैकी आहे चार महिन्यात १७० बालके कमी वजनाची जन्मल्यामुळे दगावले आहेत तर जिल्ह्यत मेंदुज्वर यामुळे ३०५ तर इतर आजारांमुळे ३७४ बालके दगावल्याची माहिती समोर येत आहे. याच बरोबरीने फुफ्फुसात जंतुसंसर्ग या आजारामुळे व श्वासोच्छवास कोंडल्यामुळे ही बालके दगावल्याची माहिती समोर येत आहे. नमुनी यामुळे पालघर जिल्ह्यत गेल्या पाच वर्ष चार महिन्यात २३२ बालकांचा मृत्यू झाला आहे तर श्वास कोंडल्यामुळे २८८ बालके दगावली आहेत. बालकांना दूध पाजल्यानंतर त्यांना झोळीत ठेवल्यामुळे दिलेल्या दुधाचे पचन क्रिया नीट होत नसल्याने हे दूध तोंडावाटे बाहेर पडून ते श्वासनलिकेत गेल्यामुळे मृत्यू होत असल्याचे कारण सांगितले जात आहे. जन्मत: श्वास कोंडले मुळेही १९४ बालकांचा मृत्यू झाल्याची बाब उघड होत आहे.

पालघर जिल्ह्यत या विविध आजारांमुळे २०१५-१६ मध्ये ५६५, २०१६-१७ मध्ये ५५७, १७- १८ मध्ये ४६९, १८-१९ मध्ये ३४८, १९-२० मध्ये ३०३ तर २०-२१ जानेवारीपर्यंत २५९ बालकांचा मृत्यू झालेला आहे. पालघर जिल्ह्यत २०१५-१६ पासून जानेवारी २०२०-२१ या कालावधीत एकूण २ हजार ५०१ बालकांचा मृत्यू विविध कारणांमुळे झालेला आहे.

पालघर जिल्ह्यत पाच वर्ष चार महिन्यात आतापर्यंत कमी दिवसात जन्मलेली बालके दगावल्याची संख्या १७० आहे. तर मुदतपूर्व प्रसूती झालेले बालमृत्यू ३३८ इतकी आहेत. जन्मत: श्वासोच्छवास कोंडून १९४ बालकांचा मृत्यू झाला असून फुफ्फुसांचे विकारांनी दगावलेल्या बालकांची संख्या २३२ इतकी आहे. विविध कारणांमुळे श्वासोच्छ्वासामुळे दगावलेल्या बालकांची संख्या २८८, अपघातात मृत्यू झालेल्या बालकांची संख्या १९, आकडी आल्यामुळे १०५ बालकांचा मृत्यू झालेला आहे. तर जन्मत: व्यंग असलेली ८८ बालके या कालावधीत दगावली आहेत. जंतुसंसर्ग झालेले १५८ बालके, तीव्र स्वरूपाचे फुफ्फुसाचे विकार असलेले १५८ बालके, प्राणी व सर्पदंशामुळे ९६, हृदयविकारामुळे ११२, तापामुळे ६१, डायरियामुळे १८ अतिसारामुळे २९, हायपोथेरीमीया यामुळे २६, पचन क्रिया नीट नसणे व अंतर्गत दोष असल्यामुळे २३ बालकांचा मृत्यू, दम्यामुळे २०, मेंदुज्वरामुळे ३०५ तर इतर आजारांमुळे ३७४ बालकांचा मृत्यू झाला आहे.

* मेंदूज्वरमुळे २०१५-१६ व्या वर्षांत १०७ बालकांचा मृत्यू झालेला आहे. तर २०१६ १७ मध्ये ५७ बालके दगावली आहेत. २०१७ १८ मध्ये ९० बालके, १८ १९ मध्ये ४५ बालके, १९ २० मध्ये दोन बालके तर २० २१ मध्ये चार अशा ३०५ बालकांचा मृत्यू झालेला आहे. असे असले तरी १९ २०, २० २१ दरम्यान मेंदुज्वर यामुळे बालके दगावण्याची संख्या कमी झालेली आहे.

* मुदतपूर्व प्रसूतीमुळे २०१५-१६ मध्ये ७४ बालके, १६-१७ मध्ये ६४ बालके, १७-१८ मध्ये ६५ बालके, १८ -१९ मध्ये ५९ बालके, १९-२० मध्ये ३८ बालके तर जानेवारी २१ पर्यंत ३८ बालकांचा मृत्यू झालेला आहे.