२५ तरुणांचा इतिहास सफरीत सहभाग; गडाचे प्राचीन वैभव आणि इतिहासाचा अभ्यास

पालघर : युवा शक्ती प्रतिष्ठान पालघरमार्फत बोईसर येथील आसावा वनदुर्गावर श्रमदान मोहिमेत दुर्गमित्रांनी महादरवाजा संरक्षक टाक्यांतून मातीचा गाळ मोकळा केला. दुर्ग परिसरातील सफाईच्या या मोहिमेत २६ दुर्गमित्रांनी सहभाग नोंदवला. तसेच गडभ्रमंती करण्यासाठी आलेल्या २५ तरुणांनी इतिहास सफरीत सहभाग घेतला.

पालघर, वसई, सफाळे, नावझे, कुडे, बोईसर इत्यादी भागांतून आलेल्या दुर्गमित्रांनी आसावा गडाचे प्राचीन वैभव, इतिहासाची सविस्तर माहिती घेतली. मोहिमेची सुरुवात गडदेवता व वास्तुदेवता पूजनाने करण्यात आली. या वेळी उपलब्ध झालेल्या कोरीव चिरेबंदी शिळा व दगडी दुर्गमित्रांनी एकत्रित करून ठेवल्या. तसेच या गडभ्रमंतीत दुर्गमित्रांनी माची प्रवेशद्वार, मेट प्रवेशद्वार, श्री हनुमान मंदिर मूळ स्थान, संरक्षक तटबंदी, चौकोनी वैशिष्टय़पूर्ण बुरुज बांधणी, शिबंदीच्या घरांचे चौथरे, जुना बालेकिल्ला, खोदीव कातळ टाके, चिरेबंदी हौद, महादरवाजा संरक्षक टाके, महादरवाजा संरक्षक तटबंदी, शिबंदी निवासस्थाने, श्री हनुमान मूर्ती, नामशेष टाके, प्राचीन नैसर्गिक वा खोदीव गुहाश्रय, चिरेबंदी बुरुज इत्यादी स्थानाची प्रत्यक्ष भटकंती करून माहिती घेतली.

किल्ले वसई मोहिमेचे श्रीदत्त राऊत यांनी गडाच्या संवर्धनासाठी तयार केलेल्या संवर्धन आराखडय़ाची प्रत दुर्गसंवर्धन संघटनांना नोंदणी करून सुपूर्द करण्यात येईल असे सांगितले. सोबतच मोहिमेच्या सुरुवातीला युवा शक्ती प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत सातवी यांनी आसावा गडाचे प्राचीन संदर्भ, गडाचे उत्तर कोकणातील स्थान, महिकावती बखरीमध्ये उल्लेख असलेला आसावा गड, बिंब राजवटीत आसावा गड प्रांत संदर्भ याची माहिती दिली.

गडावरील प्राचीन राजवटी, गडाचे पोर्तुगीजकालीन अपरिचित पाऊलखुणा, गडाचे व श्री महालक्ष्मी देवस्थानाचे ऐतिहासिक कागदोपत्री संदर्भ, १७ व्या शतकातील नरवीर चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेतील संदर्भ, सन १७८० मधील ब्रिटिश राजवटीत आसावा गड, गडावरील वास्तुविशेष संदर्भ व ओळख, आसावा गडावरील २००६ सालापासून सुरू असणारे प्रतिकूल दुर्गसंवर्धन, आगामी दुर्गसंवर्धनाची गरज व प्रतिकूल परिस्थिती, जिल्ह्यातील इतर गडकोटांवर असणारी प्रतिकूल परिस्थिती, गडावर उपलब्ध झालेल्या तीन तोफा इत्यादी विषयांवर दुर्गमित्रांशी संवाद साधला. युवा शक्ती प्रतिष्ठानचे दुर्गसंवर्धन प्रतिनिधी प्रीतम पाटील व जयेश पाटील यांनी गड मार्गदर्शक व उपक्रम नियोजन प्रतिनिधी म्हणून योगदान दिले.