चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासांत २६२ नवे करोना पॉझिटिव्ह आढळले असून, पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३ हजार ९०३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १ हजार ८५० बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

सध्या जिल्ह्यात २ हजार ७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ४६ झाली असून, यामध्ये चंद्रपूर ४२, तेलंगण एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली येथील दोन बाधितांचा समावेश आहे. तर मागील २४ तासांत मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चिमुर तालुक्यातील शिवरा येथील ४० वर्षीय व्यक्तीचा समावेश असून, त्याला ३० ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. त्याला करोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच, दुसरा मृत्यू विकास नगर वरोरा येथील ७० वर्षीय बाधिताचा आहे. १ सप्टेंबर रोजी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. दरम्यान ५ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कोरोनासह न्युमोनिया देखील होता.

तिसरा मृत्यू हा तुकुम चंद्रपुर येथील ६५ वर्षीय पुरुष बाधिताचा आहे. ३ सप्टेंबर रोजी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यांनादेखील कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया झाला होता. अखेर ५ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला आहे. चौथा मृत्यू केळझर तालुका मुल येथील ८६ वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला २६ ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. त्यांना देखील करोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने त्यांचा आज (६ सप्टेंबर) मृत्यू झाला. तर,पाचवा मृत्यु हा दादमहल चंद्रपुर येथील ९० वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. काल त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यांना देखील कोरोनासह न्युमोनिया होता.

जिल्ह्यात २४ तासांत आढळलेल्या करोनाबाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातीस-१४३, सावली तालुक्यातील- एक, बल्लारपूर तालुक्यातील- १०, गोंडपिपरी तालुक्यातील- एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील-१७, मूल तालुक्यातील -२८, राजुरा तालुक्यातील-चार, वरोरा तालुक्यातील-सात, कोरपना तालुक्यातील-दोन, भद्रावती तालुक्यातील-17, पोंभूर्णा तालुक्यातील- नऊ, नागभीड तालुक्यातील-नऊ, सिंदेवाही तालुक्यातील-तीन, चिमूर तालुक्यातील-सात, जिवती तालुक्यातील एक तसेच इतर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील-एक, ठाणे -एक तर चामोर्शी तालुक्यातून एक असे एकूण २६२ बाधित आढळले आहेत.