देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग अद्यापही वाढतच आहे. करोनाचा कचाट्यात सर्वसामान्य नागरिकांपासून ते अगदी देशपातळरील महत्वाच्या नेते मंडळींपर्यंत सर्वचजण सापडत असल्याचे दिसत आहे. करोना योद्धे समजल्या जाणाऱ्या पोलिसांपासून ते अगदी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना देखील करोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. एवढच नाहीतर करोनामुळे पोलिसांप्रमाणेच कैद्यांचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्यभरातील २७ तुरुंगांमधील १ हजार ४७८ जणांना आतापर्यंत करोनाचा संसर्ग झाला असून, सहा कैद्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तुरुंग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शुक्रवारी मिळाली आहे.

राज्यातील २७ तुरुंगांमधील १ हजार १६६ कैद्यांना व तुरुंगातील ३१२ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला असून, सहा कैद्यांचा मृत्यू झाला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

कैद्यांबद्दल पाहिलं तर नागपूर मध्यवर्ती कारागृहाची परिस्थिती राज्यात सर्वात वाईट आहे. या ठिकाणी २१९ करोनाबाधित आढळले असून, त्या पाठोपाठ पुण्यातील येरवाडा मध्यवर्ती कारागृहात १९० जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर, आर्थर रोड कारागृह व सांगली कारागृहात अनुक्रमे १८२ व १४५ करोनाबाधित आढळले आहेत.

आणखी वाचा- राज्यात २४ तासांत ३०० पेक्षा जास्त पोलीस करोना पॉझिटिव्ह, पाच जणांचा मृत्यू

तुरुंगातील कर्मचाऱ्यांना झालेल्या करोना ससंर्गाबाबत बोलयाचे झाले तर, नागपूर कारागृहात ६२ रुग्ण व मुंबई, ठाणे, औरंगाबाद, कल्याण आणि येरवाडा तुरुंगात अनुक्रमे ४६,३५,३४,३१ आणि २६ करोनाबाधित आढळले असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

१ हजार १६६ करोनाबाधित कैद्यांपैकी ८४८ जण करोनामुक्त झाले आहेत. तर ३१२ तुरुंग कर्मचाऱ्यांपैकी २७२ जण आतापर्यंत करोनामुक्त झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरातील विविध तुरुंगांमधील किमान १० हजार ५३६ कैद्यांना सोडण्यात आले आहे. तसेच, सद्य स्थितीस राज्यातील सर्व तुरुंगांची संख्या २६ हजार ४०८ असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे.