विरार :  नालासोपारा पश्चिम परिसरात दोन विकासकांनी सदनिका विकण्याच्या नावाखाली तब्बल २७ ्रग्राहकांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात नालासोपारा पोलीस ठाण्यात या विकासकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा पश्चिम छेडानगर परिसरात साई नित्य अपार्टमेंटमध्ये मुंबई भायखळा  येथील रहिवासी रामचंद्र अंकुश परब (४१) यांनी सदनिका घेतली होती.

त्यांच्यासह इतर २६ ग्राहकांनीसुद्धा या इमारतीत सदनिका घेतल्या होत्या. त्यांच्याकडून विकासक राजेश पटेल व आशीष पांडव यांनी  दोन कोटी ६६ लाख २० हजार रुपये नोंदणी स्वरूपात घेतले होते. पण पाच वर्षे झाली तरी त्यांनी ग्राहकांना सदनिका दिल्या नाहीत.

म्हणून शनिवारी या विकासकांवर गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.  अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत  लब्धे यांनी दिली.